निकाल दिवाळीपूर्वी जाहीर करण्याचे प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : Talathi recruitment exam बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.

मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षेच्या सर्व सत्रांची माहिती  टीसीएस कंपनीच्या सव्‍‌र्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे.

त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आणि काहींना अटकही करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attendance of 8 lakh 64 thousand examinees in talathi recruitment exam ysh
Show comments