कोणाच्याही घरी गेले, की दारावरील नावाची पाटी सर्वप्रथम लक्ष वेधून घेते. अशा आकर्षक ‘नेमप्लेट्स’ना उत्तम पसंतीही मिळते. सिरॅमिकपासून रंगीबेरंगी आणि तितक्याच सुबक नावाच्या पाटय़ा बनवणारी पुण्यातील कंपनी-‘अडिपा’. केवळ नावाच्या पाटय़ांपुरताच या कंपनीचा प्रवास मर्यादित नाही. घरातील भिंती सिरॅमिकच्या नक्षीने सजवून देण्यातही त्यांचा हातखंडा आहे. या कलाकृती महाग असल्या तरी केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशातून त्यांना मागणी येत आहे. आता तर या कंपनीने दुबईतही पुरवठा सुरू केला आहे.

नवीन घर घेणाऱ्याच्या मनात त्या घराबद्दल अनेक स्वप्ने असतात. तसेच काहीसे असते घराच्या दारावरील नावाच्या पाटीचे. आपले नाव दारावर लागणार या कल्पनेनेच हरखून जायला होते! नावाची ही पाटी आपल्या आवडीनुसार ‘डिझाईन’ करून घेता आली तर?..पुण्यातील ‘अडिपा’ या सिरॅमिक कलाकृती बनवणाऱ्या कंपनीने ही संकल्पना लोकप्रिय केली.

‘अडिपा’च्या नितांतसुंदर कलाकृती रुबी झुनझुनवाला यांच्या कल्पक डोक्यातून येतात. रुबी या ‘सिरॅमिक आर्टिस्ट’ आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातला. पण गेल्या तीस वर्षांपासून त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. अमेरिकेत त्यांनी सिरॅमिकची कला शिकून घेतली. देशात परत आल्यावर १९८१ मध्ये त्यांनी पुण्यात स्वत:चा मातीकामाचा ‘स्टुडिओ’ सुरू केला. त्या देशभर ठिकठिकाणी आपल्या कलाकृतींची प्रदर्शने भरवत. नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला मात्र हा मातीकाम स्टुडिओ चालवणे त्यांना आर्थिकदृष्टय़ा कठीण होऊ लागले. त्या वेळी त्यांचा मुलगा आदित्य अभियांत्रिकी शिकत होता. आई सिरॅमिकच्या एकेका कलाकृतीवर खूप मेहनत घेते हे तो पाहात होता. त्याने रुबी यांच्याबरोबर त्यांच्या व्यवसायात सहा महिन्यांची ‘इंटर्नशिप’ करायचे ठरवले. स्टुडिओचे काम सुरळीत सुरू राहील, याकडे त्याने लक्ष दिले. सिरॅमिकच्या उंची वस्तू तेव्हा तितक्याशा खपत नसत. मातीकाम म्हणजे पाणी भरायचे माठ किंवा बाजारात सहज मिळणाऱ्या सिरॅमिकच्या फुलदाण्या हीच संकल्पना होती. या वस्तू तुलनेने खूपच स्वस्तात मिळत. त्यामुळे ‘स्टुडिओ’मध्ये तयार झालेल्या सिरॅमिकच्या सुरेख, चकचकीत पण महाग कलाकृतींचा खप मर्यादित असण्यात काही नवल नव्हते. तेव्हा, असे काहीतरी उत्पादन हवे जे बऱ्याच लोकांना खरेदी करावेसे वाटेल, असा विचार रुबी आणि आदित्य करू लागले. त्या वेळी रुबी ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांसाठी भिंतीवर लावायची ‘सिरॅमिक म्यूरल्स’ करत होत्या. त्याच धर्तीवर थोडी वेगळ्या प्रकारची सिरॅमिक म्यूरल्स बनवावीत आणि ती कुणालाही भिंतीवर ‘मिक्स अँड मॅच’ करून लावता आली पाहिजेत, असे ठरले. त्यांनी सुरूवातीला दोन आणि चार इंचाच्या रंगीत नक्षीदार सिरॅमिक टाईल्स बनवल्या. तेव्हा तशा टाईल्स इतर कुठे मिळत नव्हत्या. या टाईल्स विकायच्या कशा, हा पुढचा प्रश्न होता. इथे दरवाज्यांवर लावायच्या नावाच्या पाटय़ांची कल्पना आली. त्यांनी इंग्रजी अक्षरे लिहिलेल्या छोटय़ा टाईल्स बनवल्या. व्यक्तीच्या नावाप्रमाणे या टाईल्स एकमेकाशेजारी बसवून आकर्षक ‘नेमप्लेट’ तयार करता येत होती. याच सुमारास ‘अडिपा’ ही कंपनी स्थापन झाली. आदित्य आणि पलक या आपल्या अपत्यांच्या नावांची अद्याक्षरे रुबी यांनी कंपनीला दिली. शिवाय ‘अडिपा’ चा एक अर्थ ‘पृथ्वीचे’ असाही होतो.

नावाच्या पाटय़ांचे पहिले प्रदर्शन त्यांनी मुंबईत भरवले आणि पहिल्याच दिवशी सगळा माल खपला. कोणती अक्षरे नावाच्या पाटय़ांमध्ये अधिक वापरली जातात, कोणत्या नक्षीस अधिक पसंती मिळते यावर त्यांनी पुढील सहा-सात वर्षे लक्ष केंद्रित केले. रुबी यांच्या मुलाने आणि मुलीनेही त्यांना काही काळ व्यवसायात मदत केली आणि नंतर सून आरती मदतीला आली. आता ‘डिझायनिंग’चे सर्व काम रुबी पाहतात, तर व्यवसायाच्या इतर गोष्टी आरती या सांभाळतात. त्यांचा चमू केवळ ५-६ जणांचा आहे. म्यूरल्सचा ‘स्टुडिओ’ घोरपडी येथे आहे, तर पाषाणमधील कारखान्यात नावांच्या पाटय़ांच्या टाईल्स बनतात.

‘सिरॅमिक नेमप्लेट्स’च्या क्षेत्रात ‘अडिपा’सारखी उत्पादने इतरांनीही आणली. पण आमच्या उत्पादनांमध्ये रुबी यांची कलाकाराची दृष्टी आहे. त्यामुळे बाजारातील इतर अनेक उत्पादनांपेक्षा ‘अडिपा’च्या कलाकृती खुलून दिसतात,’ असे आरती सांगतात. ‘अडिपा’चे अधिक ग्राहक अर्थातच मोठय़ा शहरांमध्ये आहेत, परंतु लहान शहरांमधूनही त्यांच्या नावांच्या पाटय़ांना मागणी येऊ लागली आहे. पुण्याबाहेर चेन्नईमध्ये त्यांचे वितरक आहेत. ‘शॉपर्स स्टॉप’ आणि ‘स्टार बझार’ या मॉलमध्ये ही उत्पादने मिळतात. पण ‘ऑनलाईन’वर विक्री करण्याचा पर्याय त्यांना अधिक जवळचा वाटतो. ‘अडिपा’च्या स्वत:च्या संकेतस्थळावर आणि ‘एनग्रेव्ह’ या संकेतस्थळावर त्यांनी बनवलेल्या नावांच्या पाटय़ा मिळतात. यात ग्राहकांना ‘ऑर्डर’ नोंदवण्यापूर्वी आपल्या आवडीनुसार विविध टाईल्स जोडून हवी ती ‘नेमप्लेट’ बनवून पाहता येते. देशात सगळीकडे त्यांनी नावांच्या पाटय़ा पुरवल्या आहेत आणि आता दुबईतही पुरवठा सुरू झाला आहे. कंपनीचे संकेतस्थळ आता अद्ययावत आणि ‘मोबाईल फ्रेंडली’ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नावांच्या पाटय़ांमध्ये ‘अडिपा’ लोकप्रिय झाली असली तरी त्याबरोबर ग्राहकांच्या आवडीनुसार भिंतीवरील ‘कस्टमाईज्ड म्यूरल्स’ तयार करणेही सुरू आहे. सिरॅमिकची अतिशय रेखीव पाने-फुले, भौमितीय आकृत्या, रंगीत टाईल्स हे सगळे एकत्र येऊन भिंतीवर साकारल्या जाणाऱ्या या ‘थ्री-डी’ कलाकृती अगदी आवर्जून पाहाव्यात अशाच आहेत. ‘घरातील भिंत म्यूरलने सजवून घेणाऱ्या ग्राहकांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. घरातील सदस्यांशी बोलताना त्यांची आवडनिवड कळते. म्यूरलमधील काही छोटे भाग बनवण्यासाठी ग्राहकांना मुद्दाम सामावून घेतले जाते. म्यूरलला त्यांचे हात लागले की त्यांना त्याबद्दल आपलेपणाची जाणीव निर्माण होते,’ असे रुबी सांगतात. आपण या व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहात नाही, त्यातील कला जास्त महत्त्वाची वाटते, असे त्या आवर्जून नमूद करतात.

sampada.sovani@expressindia.com

Story img Loader