नावीन्यपूर्ण विषयांसह वेगळ्या मांडणीने नाटकांचे दिग्दर्शन करीत प्रायोगिक नाटय़चळवळीमध्ये आपले स्थान प्रस्थापित करणारे अतुल पेठे यांचे नाटय़विषयक चिंतन शब्दबद्ध झाले आहे. गेल्या तीन दशकांचा त्यांचा प्रवास ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या पुस्तकातून वाचकांच्या भेटीस आला आहे.
‘सत्यशोधक’, ‘उजळल्या दिशा’, ‘चौक’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ‘गोळायुग’ आणि ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकांपासून ते ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे िरगण नाटय़ असे विविध प्रयोग अतुल पेठे यांनी हाताळले आहेत. हे करताना त्यामागे नेमका हेतू काय होता, त्या वेळेची राजकीय-सामाजिक परिस्थिती काय होती, ही नाटके कोणासाठी होती आणि ती करताना कोणत्या अडचणी आल्या या प्रश्नांचा वेध घेत पेठे यांनी हे लेखन केले आहे. मनोविकास प्रकाशनतर्फे शनिवारी (२८ फेब्रुवारी) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या हस्ते ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाटककार मकरंद साठे आणि प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र या वेळी उपस्थित राहणार आहेत.
नव्वदोत्तरी कालखंडातील प्रायोगिक रंगभूमीच्या रंगव्यवहाराचा लेखाजोखा करण्याचा अल्पसा प्रयत्न मी या पुस्तकाद्वारे केला असल्याचे अतुल पेठे यांनी सांगितले. आपल्याकडे नाटय़लेखकांनी आणि अभिनेत्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. मात्र, दिग्दर्शकाने केलेले लेखन अभावानेच दिसते. पण, हे माझे आत्मचरित्र नाही. तर, गेल्या तीन दशकांत मी नाटकांचा आणि नाटकातून माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना मी आदर्श मानतो असे नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक सत्यदेव दुबे, अभिनेते डॉ. श्रीराम लागू, मी ज्यांच्याबरोबर काम केले असे नाटककार मकरंद साठे आणि श्याम मनोहर यांच्याविषयीच्या लेखांसह माझे जालना आणि कणकवली येथील दिग्दर्शकीय अनुभवांविषयीचे लेखन आहे. नाटकाखेरीज आरोग्य संवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या क्षेत्रात केलेल्या कामाच्या अनुभवांचेही दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा