प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सत्यशोधक’ आणि ‘आषाढातील एक दिवस’ या दोन नाटकांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी निवड झाली आहे.
महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ या नाटकाची निर्मिती पुणे महापालिका कामगार युनियनने केली असून कामगार नेत्या मुक्ता मनोहर निर्मात्या आहेत. ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटकात महापालिका कामगारांनीच भूमिका केल्या आहेत. या नाटकाची केरळ येथील आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासह म्हैसूर येथील रंगायन राष्ट्रीय बहुरुपी नाटय़महोत्सव आणि धारवाड येथील बी. व्ही. कारंथ रंग नमन नाटय़महोत्सवासाठी निवड झाली आहे. राकेश मोहन लिखित ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी ‘आषाढातील एक दिवस’ हा मराठी अनुवाद केला आहे. या नाटकाची धारवाड येथील बी. व्ही. कारंथ रंग नमन महोत्सवासाठी निवड झाली आहे. या महोत्सवात २८ डिसेंबर रोजी ‘सत्यशोधक’ तर, २९ डिसेंबर रोजी ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
अतुल पेठे म्हणाले, ‘‘सत्यशोधक नाटकाने एका वर्षांत १०३ प्रयोग केले आहेत. युवा कलाकारांसह महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या या नाटकाचे दिल्ली, कोलकाता, म्हैसूर आणि बेळगाव येथे बी. जयश्री यांच्यातर्फे होणाऱ्या नाटय़महोत्सवासह प्रतिष्ठेच्या आठ राष्ट्रीय नाटय़महोत्सवामध्ये प्रयोग झाले आहेत. मराठी रंगभूमीसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.’’
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवात अतुल पेठे यांच्या दोन नाटकांची निवड
प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सत्यशोधक’ आणि ‘आषाढातील एक दिवस’ या दोन नाटकांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी निवड झाली आहे.
First published on: 06-12-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul pethes 2 dramas selected in national international drama festival