महिला बचत गटांसाठी सुरू केलेल्या पवनाथडी जत्रेचा समन्वयाअभावी पुरता खेळखंडोबा होण्याची दाट चिन्हे आहेत. ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पवनाथडीचा सहा ठिकाणी विस्तार करण्याचा निर्धार केला. मात्र, महिला बालकल्याण समिती व स्थायी समितीच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे यासंदर्भात ‘सावळा गोंधळ’ निर्माण झाल्याचे मंगळवारी दिसून आले. महिला बालकल्याण समितीने सहा ठिकाणी पवनाथडी सुरू करण्याचा ठराव मंजूर करून स्थायी समितीकडे पाठवला. स्थायी समितीने त्यावर ठोस निर्णय घेतला नाही. मात्र, यंदाही सांगवीतच पवनाथडी घेण्याचा अट्टाहास स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांनी केला.
पवनाथडीचे ठिकाण, त्यासाठी होणारा लाखोंचा खर्च, त्याला मिळणारा कमी-जास्त प्रतिसाद, यजमानपद यासारख्या अनेक मुद्दय़ांच्या आधारे पवनाथडीवरून दरवर्षी वाद होतात. सांगवी की एचए कंपनीचे मैदान, यावरून चालू वर्षांतच वाद झाला होता. अशा परिस्थितीत, आता अ, ब, क, ड, ई आणि फ या सहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वतंत्रपणे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्याचा विचार सुरू आहे. महिला बालकल्याण समितीने तसा ठराव मंजूर केला. त्यासाठीच्या खर्चास मान्यतेचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत आला असता, यंदाची पवनाथडी सांगवीत घेण्याची उपसूचना शितोळे यांनी मांडली व त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, मुळातील सहा ठिकाणी पवनाथडी सुरू करण्याच्या विषयावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे तो विषय मंजूर झाला की फेटाळून लावला, याविषयी कोणीही खात्रीने सांगत नव्हते. एका पवनाथडीसाठी ५० लाखाचा खर्च होतो. सहा ठिकाणी पवनाथडी सुरू झाल्यास मोठय़ा प्रमाणात खर्च होईल, तो पालिकेला आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही, असा काही सदस्यांचा विरोधी सूर होता. मात्र, आपापल्या बालेकिल्ल्यात पवनाथडी जत्रा आयोजित करण्यावर अनेक जण आग्रही होते. ही संभ्रमावस्था दूर करून आयुक्त राजीव जाधव यांना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा