पिंपरी : महापालिकेने एक लाखापुढील थकबाकीदारांच्या निवासी आणि बिगर निवासी अशा जप्त केलेल्या ४३ मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सराफा व्यापाऱ्यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. चालू बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत २२१ काेटी ५३ लाख चार हजार ६०३ रुपये आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ३० जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर, ३१ जानेवारी रोजी या मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता कर संकलन कार्यालयाने लाखबंद (सील) करून जप्त केल्या आहेत. त्यानंतरही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने त्या मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. ४३ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली. त्यात २३ निवासी व २० बिगरनिवासी मालमत्ता आहेत. मालमत्ताधारकांकडे एक लाख ते आठ लाखांपर्यंतची थकबाकी आहे. त्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, संस्था, व्यक्ती यांच्या निगडी, आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पिंपरी भाजी मंडई, मोरवाडी, दापोडी, कासारवाडी, चोविसावाडी, चऱ्होली, वडमुखवाडी, संतनगर, मोशी, किवळे, मामुर्डी, रावेत, दिघी, बोपखेल, वाकड येथील मालमत्ता आहेत.
महापालिकेने ४३ मालमत्तांचे लिलाव मूल्य जाहीर केले आहे. निवासी, बिगरनिवासी मालमत्तांचे मूल्य एक कोटीपर्यंत आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेच्या करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात ३० जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या मालमत्तेबाबत बोली लावायची असल्यास त्या मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार एक टक्का बयाना रक्कम डिमांड ड्राफ्ट (डीडी) स्वरूपात ३० जानेवारीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्या पावतीशिवाय लिलावात सहभाग घेता येणार नाही.
थकबाकीदारांना २० दिवसांची मुदत
लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या ४३ मालमत्ता धारकांना एक संधी देण्यात येणार आहे. लिलाव जाहीर झाल्यापासून २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत मूळ मालमत्ता धारकाने संपूर्ण थकबाकीसह लिलाव प्रक्रियेचा खर्च जमा केल्यास ती मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.
वाल्मीक कराडच्या मालमत्तेचा लिलाव टळला
बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटक असलेल्या वाल्मीक कराडच्या वाकड येथे दोन सदनिका आहेत. त्यापैकी पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराड यांच्या नावे असलेल्या सदनिकेचा कर थकला होता. त्यामुळे महापालिकेने नोटीस देऊन सदनिका जप्त करून लिलाव करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तत्काळ कराड कुटुुंबीयाने भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे (बीबीपीएस) थकीत एक लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर भरला. त्यामुळे लिलावाची प्रक्रिया टळली आहे. तसेच कराडची पत्नी मंजली यांच्या नावावर असलेल्या वाकड येथीलच दुसऱ्या सदनिकेचा चालू वर्षाचा कर बाकी होता. त्याचाही भरणा केला आहे.
हेही वाचा – पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचा ‘एसएमएस’ खरा की खोटा? महापालिका प्रशासनाने सांगितले…
मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ४३ मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. ३० जानेवारीपर्यंत अर्ज मागविले आहेत. ३१ जानेवारी रोजी लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.