‘नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी, हंडा रिकामाच घुमे दे रे आभाळा दे पाणी’ प्रशांत मोरे यांची ही कविता असो किंवा ‘रिताच हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माय बदलली’ ही अशोक नायगावकर यांची कविता, राज्यातील भीषण दुष्काळाचे चित्र असे काव्यातून अभिव्यक्त होताना रसिकही अंतर्मुख झाले. ‘पारोशाने नदी म्हणाली, किती दिसात गं न्हाले नाही’, या शब्दांत कोरडय़ा नदीचीही व्यथा काव्यबद्ध झाली.
गंगा लॉज मित्रमंडळ आणि प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कविसंमेलनात महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी मधू जामकर यांना प्रकाश ढेरे स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहु कानडे यांच्या ‘तळ ढवळला’, भारत दौंडकर यांच्या ‘गोफणीतून निसटलेला दगड’ आणि अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ या कवितासंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अण्णा थोरात, विजय ढेरे याप्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात रामदास फुटाणे आणि फ. मुं. शिंदे यांच्या खुसखुशीत शैलीतील निवेदनातून कविसंमेलन रंगले. यामध्ये सौमित्र ऊर्फ अभिनेता किशोर कदम, संभाजी भगत, लता अहिवाळे, इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते, संध्या पाटील, प्रशांत मोरे, अजय कांडर, लहु कानडे, भारत दौंडकर, सुनीती लिमये, अंजली कुलकर्णी, अस्मिता गुरव, विजय चोरमारे, प्रकाश घोडके, सुरेश शिंदे यांचा सहभाग होता.
सौमित्र यांनी आई-मुलाच्या नात्यावरची, लता अहिवाळे यांनी बापावरची आणि अस्मिता गुरव यांनी वयात आलेल्या लेकीची गोष्ट कवितेतून मांडली. ‘बाई म्हणाल्या एवढय़ाशा पगारात भागत नाही करायचं काय’ या कवितेतून शिवाजी सातपुते यांनी उपहास मांडला.
‘लावून गेली वेड मनाला गालावरची खळी,
बघता बघता तिने घेतला अवचित माझा बळी’
हा संध्या पाटील यांचा शेर दाद घेऊन गेला.
‘शब्द आता संपले अन् शांतता मग राहिली,
का मनाचा चंद्र आणि का मनाची काहिली’
हा प्रश्न सुनीती लिमये यांनी उपस्थित केला.
‘सरकार कुठलंही असो, तऱ्हा एकच,
हवाई पाहणी केल्याशिवाय त्यांना ग्राऊंड रिअॅलिटी कळत नाही,
मढं नदीवर गेल्याशिवाय त्यांचे पॅकेज फळत नाही’
या उपहासात्मक शब्दांतून विजय चोरमारे यांनी वास्तव मांडले.
पाऊस माळावर पडो की मळय़ात,
पाणी त्यांच्याच तळय़ात जाते
धान्य कोठेही पिको,
रास त्यांच्याच खळय़ात जाते..
या शब्दांतून सुरेश शिंदे यांनी शेतीचे वास्तव मांडले.
हंडा रिकामाच घुमे, दे रे आभाळा दे पाणी..
‘नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी, हंडा रिकामाच घुमे दे रे आभाळा दे पाणी’ प्रशांत मोरे यांची ही कविता असो किंवा ‘रिताच हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माय बदलली’ ही अशोक नायगावकर यांची कविता, राज्यातील भीषण दुष्काळाचे चित्र असे काव्यातून अभिव्यक्त होताना रसिकही अंतर्मुख झाले. ‘पारोशाने नदी म्हणाली, किती दिसात गं न्हाले नाही’, या शब्दांत कोरडय़ा नदीचीही व्यथा काव्यबद्ध झाली.
First published on: 14-03-2013 at 01:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience became contemplative after listening poem on drought