राजकारणी, बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती स्वारस्य दाखवू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील व्याख्यानमालांचा ‘थाट’ एकदम बदलला आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन अभ्यासू व्यक्ती व आवडीच्या विषयांचा समावेश व्याख्यानमालांमध्ये होऊ लागल्याने तरुणाईसह प्रेक्षकांची उपस्थिती बरीच वाढली आहे. नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीला फाटा देत आयोजन होऊ लागल्याने कधी नव्हे ते व्याख्यानांना तुडुंब गर्दी लाभल्याचे दुर्मीळ चित्र उद्योगनगरीत दिसू लागले आहे.
पिंपरी-चिंचवडची ओळख उद्योगनगरी म्हणून असली तरी शहरात सांस्कृतिक उपक्रमांचे मोठय़ा प्रमाणात आयोजन करण्यात येते. यासाठी एक मोठा वर्ग सातत्याने कार्यरत असून रसिक प्रेक्षकांनी त्यांना कायमच पाठबळ दिले आहे. शहराला २५ वर्षांहून अधिक जुनी अशी व्याख्यानमालेची परंपरा आहे. विविध संस्था, संघटना आपले यासाठी योगदान देत असल्यामुळेच प्रारंभी रुक्ष वाटणाऱ्या व्याख्यानांना अलीकडे अतिशय चांगले दिवस आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व जिजाऊ व्याख्यानमाला या जुन्या व्याख्यानमालांसह सुबोध, शिवछत्रपती, राजर्षि शाहू, लोकमान्य, जयहिंदू, माउली आदी विविध नावांनी व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात शहरात जवळपास १०० व्याख्याने होत असतील, त्यातील जवळपास ४५ दिवस सलग (एप्रिल-मे) व्याख्याने होतात. या व्याख्यानमालांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या उपक्रमाकडे पाठ फिरवणारा तरुण वर्ग मोठय़ा संख्येने व्याख्याने ऐकण्यासाठी येऊ लागला आहे, ही बाब उत्साहवर्धक असल्याचे समाधान आयोजक व्यक्त करत आहेत. जनजागृती, प्रबोधन, सद्य:स्थिती मांडणारे विषय, युगपुरुष, ऐतिहासिक असे विषय आणि अभ्यासू वक्तयांना नागरिकांकडून पसंती मिळते आहे. याशिवाय, यशस्वी ठरलेल्या मान्यवरांच्या मुलाखती तसेच कविसंमेलने यांची आवड असणारा वर्गही आहे. यापूर्वी, असे चित्र नव्हते. जेमतेम ५० ते ७० व्यक्तींची हजेरी व्याख्यानांसाठी लाभत असे. आता मात्र ही संख्या ७०० ते हजाराच्या घरात गेल्याचे दिसून येते. नामांकित वक्ता असल्यास गर्दीचा आकडा त्यापेक्षाही पुढे जातो. यंदाच्या वर्षी अनेक व्याख्यानांना तुडुंब गर्दी झाल्याचे दुर्मीळ चित्र दिसून आले. प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्राधिकरण तसेच शाहूनगर येथे झालेल्या दोन्ही व्याख्यानांना हा अनुभव आला. दोन्ही ठिकाणी बानुगडे यांना बरेच उशिरा आले. मात्र, कोणतीही कुरकुर न करता उपस्थितांनी त्यांची वाट पाहिली आणि व्याख्यानाचा आनंद घेतला. चिंचवडगावात मुक्ता बर्वे यांच्या प्रकट मुलाखतीला मोठा प्रतिसाद लाभला, तेव्हा अशी गर्दी वसंत व्याख्यानमालेलाही नसते, ही निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी होती.

जाणकार प्रेक्षकांच्या सूचनेनुसार वक्ते व व्याख्यानांचे विषय ठरवू लागलो. सर्वाचे आवडते विषय समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू लागलो, त्याचा सकारात्मक बदल म्हणजे प्रेक्षकसंख्या वाढते आहे.
– सुहास पोफळे, समन्वयक

व्याख्यानांमध्ये तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात येऊ लागला आहे. तसेच, दरवर्षी नवनव्या व्याख्यानमालांची भर पडताना दिसणे ही बाब समाधानकारक तसेच उत्साहवर्धक आहे.
– राजेंद्र घावटे, समन्वयक

Story img Loader