पूर्वकल्पना न देता फवारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : संगीत कार्यक्रमात लोकप्रिय गीते सादर होत असताना अचानक डास फवारणीचा धूर येऊ लागल्याने श्रोत्यांचा रसभंग झाला. पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. कार्यक्रम सुरू असताना डास फवारणी कशी केली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे. क्षेत्रीय कार्यालयाने आम्हाला पूर्वकल्पना न देता डास फवारणी केली असल्याची माहिती महापालिका रंगमंदिर व्यवस्थापक सदाशिव लायगुडे यांनी दिली.

नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी पाच वाजता रिदम एन्टरटेन्मेंटस प्रस्तुत ‘नजराना प्यार का’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू झाला. डॉ. अमोल अभ्यंकर, दीपक कुलकर्णी, पल्लवी हरकल आणि पल्लवी अनीखिंडी हे गायक कलाकार सादर करीत असलेल्या गीतांना श्रोत्यांची दाद मिळत होती.

नाकातोंडात धूर

कार्यक्रमाच्या मध्यात फवारणीचा धूर सभागृहात आला. हा धूर नाका-तोंडात जाऊ लागल्यामुळे श्रोत्यांसह गायक कलाकार खोकायला लागले. सर्वाचे डोळे चुरचुरू लागले. रसभंग झाल्यामुळे आम्हाला कार्यक्रम थांबवावा लागला, असे डॉ. अमोल अभ्यंकर यांनी सांगितले. डास फवारणीच्या धुराबाबत तक्रार करण्यासाठी गेलो असता कार्यालयामध्ये कोणीही जबाबदार व्यक्ती भेटली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या नियोजनानुसार डास फवारणी केली. मात्र, ही फवारणी करण्यापूर्वी आमच्या विभागाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम आहे की नाही याची माहिती घ्यायला हवी होती, असे लायगुडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience suffer due to mosquito spray smoke in music program
Show comments