पुणे : भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक सोहळा शहरातील संस्था-संघटनांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन समुदायाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, अभय छाजेड, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले यांनी सोन्या मारुती चौकात भगवान महावीरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. समितीतर्फे नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर घेण्यात आले. वडगाव धायरी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. भवानी पेठेत ‘आयुष्यमान भारत’ कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. पोपट ओस्तवाल, राजेश शहा, सुनील कटारिया, नितीन जैन, नीलेश शहा, भूपेंद्र शहा, भद्रेश बाफना, भरत सुराणा, संदीप भंडारी, अभय जैन या वेळी उपस्थित होते.

‘अभय प्रभावना संग्रहालया’तर्फे ‘अनुभवात्मक पॅकेज’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, १० ते १३ एप्रिलदरम्यान मार्गदर्शन दौरे, तज्ज्ञ साध्वींची सत्रे आणि ‘तीर्थंकर महावीर यांची कालातीत तत्त्वे’ या विषयावर सादरीकरण करण्यात येणार आहे. संग्रहालयाचे संस्थापक अभय फिरोदिया यांनी ही माहिती दिली. ‘जैन तत्त्वज्ञानाची शाश्वत तत्त्वे समजून घेता यावे म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे,’ असे फिरोदिया यांनी सांगितले. श्री सत्तावीसा जैन सिटी ग्रुपतर्फे भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात ‘पाणपोई’चे उद्घाटन आणि सरबत वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष दिलीप मुथा, उपाध्यक्ष वस्तीमल सोलंकी, कार्याध्यक्ष भरत सोलंकी, सचिव मूळचंद ओसवाल, खजिनदार किरण जैन, रणजीत कोवडिया, कीर्ती परमार या वेळी उपस्थित होते.

श्री खंडेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष रतन जैन, सचिव नरेंद्र जैन, खजिनदार प्रकाश शहा, विश्वस्त साकलचंद कटारिया, धनराज निबजीया, प्रवीण जैन या वेळी उपस्थित होते. नारायणगाव येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. जैन ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष विलास भळगट, सचिव अतुल कांकरिया, जैन सकल संघाचे अध्यक्ष किशोर पोखरणा, जैन सोशल क्लबचे अध्यक्ष स्वप्नील भन्साळी या वेळी उपस्थित होते. क्लबतर्फे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांच्या हस्ते ‘पाणपोई’चे उद्घाटन करण्यात आले.

शिरूर शहरात जैन समुदायाच्या वतीने भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आले. शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी मिठाईचे वाटप केले. संघपती भरत चोरडिया, वसंतलाल गादिया, सतीश धारिवाल, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, रमणलाल बोरा, सुनील कांतीलाल बाफना, जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना, कपिल बोरा, देवल शहा आदी या वेळी उपस्थित होते.