हल्ली अनेक हॉटेल आणि खाण्याच्या टपऱ्यांवर पदार्थाची जाहिरात करणाऱ्या वेगवेगळ्या पाटय़ा वाचायला मिळतात. पुणेरी मिसळ, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्हापुरी मिसळ, नाशिकची मिसळ.. या आणि अशा अनेक पाटय़ा लावलेल्या हॉटेलांमध्ये खरोखरच त्या त्या चवीचे पदार्थ मिळतात का याबाबत शंकाच आहे. विशेषत: पुणेरी आणि महाराष्ट्रीयन ही विशेषणं तर कोणत्याही पदार्थाना लावून पदार्थ विकले जातात. अर्थात अशाही भेसळीच्या जमान्यातही काही अस्सल ठिकाणं पुण्यात आहेतच की. खरे खवय्ये अशा ठिकाणी बरोबर पोहोचतात आणि अस्सल पदार्थाचा आस्वाद तेथे घेतात.

लक्ष्मी रस्त्यावर बेलबागेजवळ असलेलं ‘पूना गेस्ट हाऊस’ हे एक असंच ठिकाण. सर्व चवींची भेसळ न करता केवळ आपलं मराठीपण आणि पुणेरीपण टिकवून उत्तमोत्तम पदार्थ खवय्यांना खिलवावेत तर ते पूना गेस्ट हाऊसनंच. तब्बल ऐंशी वर्षांपूर्वी ‘पूना रिफ्रेशमेंट हाऊस’ या नावानं सुरू झालेलं हे हॉटेल केवळ हॉटेलच नाही तर मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित सर्वाचच गेली अनेक वर्ष हे हक्काचं राहण्या-जेवणाचं ठिकाणही होतं. मराठी कलावंतांचं आणि अनेक दिग्गजांचं वास्तव्य इथं झालं. पूना गेस्ट हाऊस सुरू झालं, तेव्हा बाजीराव चिवडा आणि मस्तानी मिसळ ही इथली खासियत होती. शिवाय खाणावळही होती. अर्थात अशा गोष्टी इतिहासजमा होऊ न देता उत्तम पदार्थाची ही परंपरा या घराण्याची तिसरी पिढी म्हणजे किशोर सरपोतदार हे समर्थपणानं सांभाळत आहेत. पूना गेस्ट हाऊस हे हॉटेल आणि पथिकाश्रम हे लॉजिंग या दोन व्यवसायांना मोठा इतिहास आहे आणि त्याची साक्षही इथे जाणाऱ्यांना घेता येते.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
how to make Kolhapuri style bhadang
Kolhapuri Bhadang: ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक लागते? मग चटपटीत, ‘कोल्हापूरी भडंग’चा डब्बा ठेवा बॅगेत; वाचा झटपट होणारी सोपी रेसिपी
cm devendra fadnavis loksatta news
आमच्या कुटुंबात ‘तिच’ सर्वाधिक प्रगल्भ, फडणवीस कोणाबाबत बोलले?
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…

खास मराठी किंवा पुणेरी चवीचे पदार्थ हे पूना गेस्ट हाऊसचं वैशिष्टय़ आजही कायम आहे आणि किशोर सरपोतदार यांच्याकडून ते मुद्दाम जपलही जात आहे. अन्यथा अनेकविध चवींचे पदार्थ देणं त्यांना सहजशक्य होतं, पण त्यांनी जाणीवपूर्वक तसं केलेलं नाही. मराठी पदार्थाचाच आस्वाद घेण्यासाठी इथले दडपे पोहे खायलाच हवेत. हा खास कोकणी पदार्थ. ओल्या नारळाचा सढळ हस्ते वापर करून तयार केले जाणारे दडपे पोहे आणि त्याच्याबरोबर पोह्य़ाची मिरगुंड ही इथली खास डिश. इथले दडपे पोहे जसे अपरिहार्य तसाच आणखी एक पदार्थ म्हणजे इथली पुणेरी मिसळ. हल्ली पुणेरी मिसळ या नावाखाली वाटेल तशी मिसळ तयार केली जाते. तसला प्रकार इथे नाही. मुळात, पोहे, बटाटा भाजी, उसळ, शेव-चिवडा, कांदा आणि सँपल किंवा र्ती हे मिसळीचे घटक पदार्थ आहेत. सध्या अनेक ठिकाणी जी मिसळ दिली जाते तिच्यात फक्त फरसाण वापरलेलं असतं. फरसाण आणि वरून सँपल असला प्रकार सरपोतदारांना बिलकुल मान्य नाही. मिसळीतल्या या फरसाणवर सँपल घातलं की त्याचा लगदा होतो. त्यामुळे ती मिसळ काही खरी नाही. ‘पूना गेस्ट हाऊस’मधील मिसळ खास पुणेरी चव जपणारी अशीच. पोहे, बटाटा भाजी, शेवचिवडा यांचे अगदी शिस्तीनं लावलेले थर आणि बरोबर सँपलची वाटी, पाव, लिंबू अशी मिसळ इथे मिळते. ही मिसळ घेतल्यावर इतर  मिसळींमधला आणि इथल्या मिसळीतला फरक आपल्या लक्षात येतो.

मराठी डिशबरोबरच इथे असलेली महाराष्ट्रीयन थाळी ही देखील वेगळी आणि सर्व वैशिष्टय़ जपणारी अशीच असते. मुळात ती पाहूनच समाधान होतं. घडीच्या पोळ्या किंवा भाकरी, खास चवीची एक पालेभाजी, एक उसळ, आमटी, वरण भात, कोशिंबीर, पापड, चटण्या, लोणची अशा अनेक पदार्थाच्या या ताटातील सर्व पदार्थ मराठी चवीचेच असतात. हल्ली थाळीत फरसाण म्हणून काही पदार्थ दिले जातात. मात्र ते बहुतेक वेळा इतर प्रांतातलेच असतात. इथल्या थाळीत मात्र फरसाण म्हणून खास आळूची वडी, कोथिंबिरीची वडी असे मराठी पदार्थ मिळतात. शिवाय मसालेभात, आळूची भाजी या आणि अशा अनेक पारंपरिक पदार्थाचा आस्वाद इथे घेता येतो.

‘पूना गेस्ट हाऊस’च्या उकडीच्या मोदकांबद्दलही सांगायलाच हवं. उकडीचे आणि हातवळणीचे मोदक कित्येक हजारांमध्ये तयार करण्याचं कसब असलेली मंडळी इथे आहेत. उकडीच्या मोदकांसाठीही हे ठिकाण खूप प्रसिद्ध झालं आहे. जी गोष्ट उकडीच्या मोदकांची तीच दिवाळीच्या फराळाची. ना नफा ना तोटा तत्त्वावरील दिवाळी फराळ, परदेशात फराळ पाठवण्यासाठीची खास व्यवस्था, मोबाईल फराळ विक्री या आणि अशा अनेक गोष्टी या किशोर सरपोतदार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. अशा उपक्रमांना हजारो पुणेकर जो प्रतिसाद देतात तो पाहता या कल्पना यशस्वी झाल्याचीच खूणगाठ पटते.

हॉटेल आणि केटरिंग असा एकीकडे अत्यंत यशस्वीरीत्या व्यवसाय करत असतानाच आपल्या मराठी पारंपरिक पदार्थाचं जतन व्हावं, त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा, ते अनेकापर्यंत पोहोचावेत यासाठीही सरपोतदार यांची धडपड अखंडपणे सुरू असते. एकुणात पूना गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर एका अस्सल मराठी खवय्याशीही आपली भेट होते, हे नक्की.

Story img Loader