पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) उद्याच्या जगात मोठी उलथापालथ होणार असल्याचे मत ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केले. “एआय’च्या वापरामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. कामाचे स्वरूप बदलत आहे. पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रही या बदलांना अपवाद ठरणार नाही,’ असे गोडबोले यांनी सांगितले.समवेदना संस्थेच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘एआयची जादू आणि उद्याचे जग’ या विषयावर गोडबोले बोलत होते. ‘समवेदना’चे विश्वस्त प्रकाश तुळपुळे, सल्लागार राजीव साबडे, मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी या वेळी उपस्थित होते. ‘एआय’च्या विकासात करण्यात आलेले प्रयोग ते ‘एआय’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर गोडबोले यांनी भाष्य केले.
गोडबोले म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस मायनिंग अशा विविध तंत्रज्ञानांमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. वैद्यकीय क्षेत्रातही ‘एआय’मुळे अत्याधुनिक उपकरणे, उपचारपद्धती यांत आमूलाग्र बदल होत आहेत. येणारा काळ कल्पनेपेक्षाही अधिक वेगवान असेल. ‘एआय’मुळे सर्वच व्यवसाय आणि रोजगाराचे स्वरूप बदलणार असून, नवीन बदल, तंत्रज्ञान आत्मसात करणे सर्वच वयोगटांना अनिवार्य झाले आहे. मात्र, या बदलांमुळे माणसांचे सामाजिक आयुष्य धोक्यात येणार नाही. उलट एकमेकांचा संवाद वाढेल.’
‘माणसाला पडणारे प्रश्न आणि त्यावर शोधलेली उत्तरे माणसाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा घटक आहेत. माणसाने कल्पनाशक्तीच्या बळावर स्वत:च्या सुखासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या. प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण स्वत:च्याच मेंदूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था नव्या जगात कालबाह्य ठरतील,’ असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘अनेक क्षेत्रांत रोजच्या कामाची जागा ‘एआय’ घेईल. या बदलांना आत्मसात करून घ्यावे लागेल. हे बदल स्वीकारले नाहीत, तर कंपन्या कालबाह्य झाल्या, तशी माणसेही कालबाह्य होतील.’
‘कार्यालयांची ‘संग्रहालये’ होतील’
‘घरातून काम करणे ही संकल्पना समाजात रूळत चालली आहे. ‘एआय’च्या वापरामुळे कामाचे स्वरूप पालटते आहे. कार्यालयात जाऊन काम करणे कालबाह्य होत आहे. ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानामुळे साधने सहज उपलब्ध होत आहेत. संदेश आणि संवादाचे माध्यमही बदलते आहे. त्यामुळे आगामी काळात कार्यालयांची ‘संग्रहालये’ होतील,’ असे मत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
माणसाचे आयुष्य असे बदलेल…
प्रत्येक क्षेत्रातील मध्यस्थ हळूहळू कमी होतील.
ग्राहक आणि विक्रेते यांना थेट व्यवहार करणे शक्य.
दुकानात जाण्याची गरज राहणार नाही.
रोबोंच्या माध्यमातून युद्धे लढली जातील.
दुर्धर रोगांवरही इलाज करणे सहज साध्य होईल.