पुणे : विनोदाच्या प्रांतात महिलांची संख्या अद्यापही कमीच असल्याचे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘वास्तवापासून क्षणभर दूर जाऊन विचार करण्याचा मोकळेपणा, मनाचे मुक्तपण महिलांना दीर्घ काळ मिळत नाही. त्यामुळे पूर्वीपासूनच विनोदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या कमीच दिसते,’ असे गोडबोले यांनी सांगितले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात गोडबोले बोलत होत्या. ‘मराठी विनोद : काल, आज आणि उद्या’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ‘मराठी विनोदाला दीर्घ परंपरा आहे. आधुनिक काळात कोल्हटकरांनी मराठी साहित्याला वाट मोकळी करून दिली. त्यानंतरच्या प्रत्येक कालखंडात साहित्यातून विनोद मोकळपणाने येऊ लागला. अत्र्यांनी विनोदाचे प्रचंड स्वरूप मराठीला दाखवले. त्यांचा विनोद निर्भीड होता. त्यांच्यानंतर पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी ही परंपरा पुढे नेली. चिं. वि. जोशींचा विनोद निर्मळ होता. त्यांच्या एवढा निर्मळ विनोद करणे मराठीत कुणालाही, अगदी पुलंनाही जमले नाही. पुलंनी आकस नसलेला, भाषेचे सौष्ठव दाखविणारा, विलक्षण शब्दखेळाने युक्त विनोद मराठीला दाखवला. त्यांच्या विनोदात सहजता होती. भाषेचे सामर्थ्य होते. त्याही पलीकडे जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले लेखन पुलंनी केले,’ असे गोडबोले यांनी सांगितले.

‘स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण विनोद साहित्यातून पुढे येऊ लागला. द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्यासारख्या साहित्यिकांनी गावगाड्याच्या जाणिवा, अस्वस्थता विनोदाच्या रूपात मांडल्या. पारंपरिक मराठी साहित्यातील शाब्दिक विनोद त्यांच्या साहित्यात दिसत नाही. मात्र, परिस्थितीवर आधारित विनोद या लेखकांनी मराठीत रुजवला. ग्रामीण भागातील संदर्भ विनोदी अंगाने मराठीत पहिल्यांदाच येण्याचा हा काळ होता. आज शहरी आणि ग्रामीण जीवनात फारसे अंतर राहिलेले नाही. जाणीवांचे सपाटीकरण झालेला हा काळ आहे. त्यामुळे वेगळ्या ग्रामीण संवेदना आजच्या विनोदी लेखानात दिसत नाहीत,’ असे त्यांनी नमूद केले.

गोडबोले म्हणाल्या, ‘मनाची तगमग विनोदाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. जूनाट रूढी-परंपरांची चेष्टा करणाऱ्या विनोदाचे स्वरूप पालटले आहे. आज विनोदाच्या माध्यमातून सुधारणांची, आधुनिकतेची चेष्टा केली जात आहे. आता विनोदाचा चेहरा बदलतो आहे. दृश्य विनोदाचा पगडा वाढतो आहे. आजचे बटबटीत विनोद बऱ्याचदा अंगावर येतात. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. जोपर्यंत समाजात श्रेणी आहे, तोपर्यंत विनोदही जिवंत राहील. मात्र, सक्ती हा विनोदाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जशी भाषा अमर आहे, तसाच विनोदही अमर राहील. मात्र, समाजानेही अनावश्यक विनोदाचा हव्यास सोडला पाहिजे. विनोद वापरणाऱ्यांनी तारतम्य बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.’

पारंपरिक शब्दनिष्ठ विनोद आज हरवत चालला आहे. समाजाची भाषेवरची पकड कमी होत आहे. शब्दांची समृद्धी दिवसेंदिवस कमी होताना दिसते.

मंगला गोडबोले, ज्येष्ठ लेखिका