‘क-क- कॉम्प्युटरचा’, ‘हे सारे मला माहीत हवे!’, ‘शेअर बाजार’, ‘हात ना पसरू कधी’ या पुस्तकांचे लोकप्रिय लेखक रवींद्र देसाई (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अविवाहित होते. देसाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
रवींद्र देसाई यांनी लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले. समृद्ध करणारी आशयपूर्ण मांडणी, वाचकाला सहज समजेल अशी सुलभ भाषा आणि नर्मविनोदाने नटलेली लेखनशैली ही त्यांच्या पुस्तकांची वैशिष्टय़े होती. ‘क-क-कॉम्प्युटरचा’, ‘हात ना पसरू कधी’ आणि ‘ग्यानबाचा गोबर गॅस’ या त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य सरकारचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले होते. वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.
गोबर गॅस या क्षेत्रात देसाई यांनी मूलभूत काम केले. मुळशी, मावळ तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना रास्त दरामध्ये गोबर गॅस उपलब्ध करून दिला. लेखणीबरोबरच देसाई यांचे वाणीवरही प्रभुत्व होते. रसाळ आणि नर्मविनोदी वक्तृत्वशैलीने ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करीत असत. विषयाची सखोल जाण आणि श्रोत्यांबरोबर खेळीमेळीच्या गप्पा वाटाव्यात अशी शैली यामुळे त्यांची व्याख्याने ही मेजवानी असायची. अनेक कळीच्या सामाजिक विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सामाजिक माध्यमांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. एखाद्या समस्येचे वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याची त्यांची सर्जनशीलता लेखनातून प्रतिबिंबित होत असे.
लेखक रवींद्र देसाई यांचे निधन
‘क-क- कॉम्प्युटरचा’, ‘हे सारे मला माहीत हवे!’, ‘शेअर बाजार’, ‘हात ना पसरू कधी’ या पुस्तकांचे लोकप्रिय लेखक रवींद्र देसाई...
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2015 at 03:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author ravindra desai died