रिक्षा थांब्यांचा वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण व महापालिका यांनी संयुक्तपणे अभ्यास करून रिक्षासाठी दिलेले अधिकृत थांबे पुन्हा एकदा विस्कटले आहेत. वाहतुकीला अडथळा करणारे अनेक अनधिकृत थांबे पुन्हा एकदा सुरू झाले असून, प्रशासकीय यंत्रणेने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पुण्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत चाललेला आहे. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विविध घटकांपैकी रिक्षाचे अनधिकृत थांबे हाही महत्त्वाचा घटक आहे. शहरात मुख्य रस्त्याच्या लगत विविध अनधिकृत रिक्षा थांबे आहेत. हे थांबे रस्त्याचा काही भाग अडवीत असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरतात.
रिक्षा थांब्यांचा वाहतुकीला अडथळा होऊ नये व प्रवाशांना मुख्य रस्त्याच्या जवळच रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अस्तित्वात असताना एका संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने पुणे व िपपरी-चिंचवड शहरातील विविध रिक्षा थांब्यांच्या जागेचा अभ्यास करून वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, अशा जागा रिक्षा थांब्यांसाठी निवडल्या होत्या. या थांब्यांच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या रिक्षांची संख्याही निश्चित करण्यात आली होती. त्याबाबचे फलकही संबंधित ठिकाणी लावण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस या थांब्यांवर रिक्षा थांबविल्या गेल्या. मात्र, सद्यस्थिती लक्षात घेता बहुतांश अधिकृत रिक्षा थांबे ओस पडलेले दिसून येत आहेत.
शहरातील कोणत्याही रिक्षा थांब्यावर कोणत्याही रिक्षा चालकाला त्याची रिक्षा थांबवता यावी, हाही अधिकृत थांबे निर्माण करण्यामागचा उद्देश होता. मात्र, आता पुन्हा शहरात त्या-त्या भागातील रिक्षा चालकांचे खासगी थांबे निर्माण झाले आहेत. हे थांबे एकीकडे वाहतुकीला अडथळा ठरत असताना अशा रिक्षा थांब्यांवर ठराविक रिक्षा चालकांचीच मक्तेदारी आहे. संबंधित रिक्षा थांब्याचा सभासद नसलेल्या दुसऱ्या कोणत्याही रिक्षा चालकाला तेथे रिक्षा लावता येत नाही. खासगी रिक्षा थांब्यांमुळे अधिकृत थांबे निर्माण करण्याचे सर्व उद्देश असफल ठरले असतानाही अशा रिक्षा थांब्यांवर कारवाई होत नसल्याबाबत अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा