दोन एप्रिल हा जागतिक स्वमग्नता (ऑटिझम) दिवस जाहीर करण्यात आला आहे. या दिवसाच्या निमित्ताने स्वमग्नतेबाबत जनमानसांत जागृती करण्यात येते. प्रिझम फाउंडेशनमध्ये स्वमग्न विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तेथे अध्ययन अक्षमतेबरोबरच मतिमंदत्वाची लक्षणे असणारी मुले आहेत. त्यांच्याकडून अभ्यास, खेळ, संगीत, ज्ञानेंद्रियांसाठी आवश्यक असणारे उपक्रम करून घेतले जातात. या विषयी प्रिझम फाउंडेशनच्या संचालक हर्षा मुळे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
ऑटिझम म्हणजे काय?
- ऑटिझम म्हणजे स्वमग्नता ही एक अवस्था आहे. ऑटिझम होण्यामागे कोणतेही एक असे ठोस कारण सांगता येत नाही. पर्यावरण आणि आनुवांशिकता या दोन्ही कारणांमुळे मुलांमध्ये स्वमग्नता दिसून येते. स्वमग्नता हा विकासात्मक अपंगत्वाचा प्रकार म्हणूनदेखील ओळखला जातो.
स्वमग्नतेचा त्रास कधीपासून लक्षात येतो?
- ऑटिझम झाला आहे, हे सांगण्यासाठी प्रयोगशाळेतील कोणतीही चाचणी उपयोगात येत नाहीत. सामाजिक कौशल्य आणि वर्तणूक कौशल्य यांच्या माध्यमातून स्वमग्नतेचे निदान केले जाते. जगभरात दहा हजार मुलांपैकी १०० मुले ‘एएसडी’ची (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) आढळतात. वय वर्षे दोन अथवा तीनपासून मुलांमध्ये स्वमग्नतेची लक्षणे दिसायला लागतात. अमेरिकी ॲकॅडमी ऑफ पीडिॲट्रिशननुसार, मूल एक वर्षाचे झाल्यापासूनच ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकसारखीच असतात.
ऑटिझम झालेल्या मुलाला कोणत्या प्रकारच्या समस्या भेडसावतात?
- या मुलांच्या भाषा विकसनात अडचणी येतात. ती समाजात न मिसळता एकटे राहणे पसंत करतात. ती नजरेला नजर देत नाहीत. संवाद साधण्यातही ती मागे असतात. त्याच त्याच गोष्टींचे उच्चारण करतात. त्यांच्यात वर्तन समस्या असतात, त्यांच्यातील पंचेद्रियांच्या क्षमता कमी-जास्त असतात. या सगळ्याच समस्या एकाच व्यक्तीत दिसतातच असे नाही; तर व्यक्तिपरत्वे त्या कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक मुलामध्ये असू शकतात.
ऑटिझमग्रस्त व्यक्ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकते का? आणि त्यासाठी उपाययोजना कोणत्या असतात?
- ऑटिझम असणाऱ्या मुलांना कोणत्याही एकाच प्रकारचे उपचार पुरेसे नसतात. या मुलांच्या लक्षणांवरून आणि वर्तनावरून उपचारपद्धती ठरवावी लागते. त्यासाठी एबीए अर्थात अप्लाइड बीहेवियर ॲनॅलिसिस, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, संवादकौशल्ये विकसित करणे, स्पीच थेरपी, विशिष्ट प्रकारचे अभ्यासक्रम, व्यायाम, संगीत, योगासने, ध्यान, श्वासाचे प्रकार, प्राणायाम या सगळ्या गोष्टींचा समावेश असावा लागतो. या सगळ्याच्या योग्य नियोजनाचा स्वमग्न मुलांना उपयोग होऊ शकतो.
ऑटिझम झालेल्याचे भवितव्य काय असते?
- स्वमग्न मुले अभ्यासामध्ये प्रगती करू शकतात. स्वतःच्या जीवनात चांगल्या प्रकारे जगू शकतात, पण त्यांना सातत्याने कोणाची तरी मदत घ्यावीच लागते. असे असले, तरी या मुलांचा शिक्षणाचा तसेच आनंदी राहण्याचा अधिकार हिरावून घेऊन चालणार नाही.
ऑटिझमग्रस्तांबरोबर कशाप्रकारे वागणे आवश्यक आहे?
- पालक, शिक्षक आणि मित्रमंडळींसह समाजाने जर या मुलांचा स्वीकार केला, तसेच त्यांच्याबरोबर वागताना, बोलताना सकारात्मकतेचा आणि संयम बाळगल्यास आणि त्यांना योग्य अभ्यासक्रम दिल्यास या मुलांना स्वमग्नतेच्या अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.
shriram.oak@expressindia.com