वाहतूक पोलिसांची मात्र डोळ्यांवर पट्टी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करणे अशाप्रकारे वागणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असतानाही वाहतूक पोलीस मात्र डोळ्यांवर पट्टी लावून असतात. पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांची ‘दादागिरी’ वाढली, त्याला पोलिसांची हप्तेखोरी हेच मोठे कारण आहे. सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवून विविध मार्गाने छळणारे पोलीस मुजोर रिक्षाचालकांपुढे मात्र सपशेल नांगी टाकतात, हे चित्र दररोज दिसून येते.

पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी ३० टक्के मालक तर उर्वरित चालक आहेत. साधारणपणे प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांचा ठिय्या असतो. काही अपवाद वगळता रिक्षांच्या उभ्या राहण्याच्या विविध तऱ्हा आहेत. पिंपरीतील आंबेडकर चौकात वेडय़ावाकडय़ा पद्धतीने रिक्षा उभ्या करण्याची जणू स्पर्धा असते. विशाल सिनेमाकडे जाणारा रस्ता, रत्ना हॉटेलकडील रस्ता, नेहरूनगरकडे वळणारा रस्ता आणि पुतळ्यासमोरच कशाही पद्धतीने रिक्षा उभ्या असतात. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालकांची भर चौकात मुजोरी सुरू असते. पिंपरीतून बाजारपेठेकडे जाणाऱ्या पुलावर रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. कासारवाडीत विठ्ठल मंदिरासमोर आडव्या रिक्षा उभ्या करून रस्ता अक्षरश: बंद केला जातो. हाच प्रकार दापोडी ते निगडी दरम्यान चौकाचौकात दिसून येतो. पोलीस त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात.

रिक्षाचालकांच्या अशा वागण्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. पोलीस काहीतरी कारवाई करतील, या आशेवर नागरिक असतात. मात्र, हप्तेखोरीच्या विळख्यात अडकलेले पोलीस कारवाई करत नाहीत. एका रिक्षाला साधारणपणे १२०० रूपये हप्ता द्यावा लागतो आणि हप्ते न देणाऱ्यांवर नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जाते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. ‘वसुली’च्या कामात पोलिसांना वॉर्डन लोकांची भरपूर मदत होते. पूर्वी थेट पोलीसच हप्ते घेत होते. मात्र, ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकण्याची भीती असल्याने आता वेगळी ‘मोडस’ वापरण्यात येते. पोलिसांच्या सूचनेनुसार रिक्षावाल्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाचा एक म्होरक्या करण्यात येतो. त्या म्होरक्याने इतरांचे पैसे गोळा करायचे आणि वॉर्डनला आणून द्यायचे. वॉर्डनने ते पैसे, वसुली गोळा करणाऱ्याकडे आणून द्यायचे. मग, त्याने इतर पोलिसांना त्याचे वाटप करायचे, अशी ही पद्धत असल्याचे काही रिक्षाचालकांनी सांगितले.

भाडे नाकारण्याचे प्रमाण अधिक

भाडे नाकारणे ही रिक्षाचालकांची जुनी खोड आहे. जवळच्या अंतराची भाडी तर स्वीकारलीच जात नाहीत. लांब पल्ल्याच्या भाडय़ासाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. प्रवाशांशी उद्धट वर्तन हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. अनेक रिक्षाचालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिसांशी अनेक प्रकरणात रिक्षाचालकांचा सहभाग आढळून आला आहे. अशा अपप्रवृत्ती असलेल्या रिक्षाचालकांच्या विरोधात रिक्षा संघटनेने आंदोलन केल्याचे उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी निगडीत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून रिक्षाचालकांचे विविध ‘उद्योग’ पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ‘स्क्रॅप’ रिक्षा चालवणारे, ‘बॅच-बिल्ला’ नसलेले, नियमांना फाटा देणारे, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचे हे आंदोलन होते. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याऐवजी हप्ते घेऊन पोलीस त्यांना पाठीशी घालतात, असा आंदोलक रिक्षाचालकांचा आरोप होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto rickshaw drivers bullying in pimpri chinchwad