प्रथमेश गोडबोले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा देयक देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ (पीडीई) करताना वीजदेयकाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजदेयकाच्या नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा देयकावरील नाव बदलासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, सूची दोन आणि इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. आता सदनिका किंवा दुकान खरेदीचा दस्त नोंदवितानाच वीजदेयक नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्याने नागरिकांचा मनस्ताप वाचणार आहे, असे महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ललित पाटील प्रकरणात ‘ससून’च्या अधिष्ठात्यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे सदनिका, दुकान खरेदी केले असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती, नाहरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर महावितरणकडून लघुसंदेश, दुवा पाठविण्यात येतो. लघुसंदेश पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. तसेच आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या दुव्यावर अपलोड न केल्यास नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे प्रत्यक्ष अर्ज करावा लागणार आहे.

हेही वाचा >>>शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव; राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी केली ‘ही’ मागणी

प्रक्रिया कशी कराल?

नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे संकेतस्थळ सुरु केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी पीडीईमध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा देयकाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी दुवा पाठविण्यात येईल.

मालमत्ता खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्यावी

मालमत्तेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजदेयकांची थकबाकी नवीन मालकांकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automatic change of name in electricity bill after purchase of old propertypune print news psg 17 amy