पुणे : ऐन प्रवासातून खासगी विमान परत आणणे आपत्कालीन स्थिती सोडून इतर वेळी सहज शक्य नाही, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज प्रवास करत असलेले विमान हवेत असताना वळवून परत आणण्यासाठी पोलिस प्रशासन, हवाई दल, नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए), संरक्षण विभाग यांच्या परवानग्या अवघ्या काही मिनिटांत मिळाल्याने त्याकरता मोठी ‘शक्ती’ पणाला लागल्याची चर्चा आहे. ही घटना एखाद्या चित्रपटात शोभणारी आहे. त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत असे काही घडल्यास प्रशासनाची भूमिका काय असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, खासगी विमानांसाठी नेमक्या कोणकोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, असे विचारले असता, हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘डीजीसीएच्या निर्देशांनुसार, हवाई उड्डाणांसाठी परवानग्या बंधकारक आहेत. यामध्ये केवळ फरक इतकाच आहे, की नागरी उड्डाणांसाठी प्रवाशांकडून केवळ आसन शुल्क आकारले जाते. त्यासाठी दैनंदिन हवाई वाहतूक परवानगी घेतलेली असते. मात्र, खासगी विमानासाठी (चार्टर्ड प्लेन) प्रवाशाकडून संपूर्ण शुल्क आकारले जाते. हे विमान कोणत्या विमानतळावरून कोणत्यामार्गे उड्डाण करणार आहे, त्यासाठी मापदंड निश्चित केले असून, जेवढ्या उशिरा खासगी विमानाचे आरक्षण केले जाते, तेवढा अधिक पैसा मोजावा लागतो.

किमान तीन दिवस अगोदर विमानाचे आरक्षण करणे बंधनकारक आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत असते. संबंधित परवानगीची प्रक्रिया किचकट असली, तरी खासगी विमान कंपन्यांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेची रूपरेषा पूर्ण माहिती असते. त्यामुळे परवानगी मिळविण्यास फारसा त्रास होत नाही.‘एकदा विमानाने हवाई उड्डाण केल्यानंतर नियोजित ठिकाणी विमान उतरेपर्यंतचे संपूर्ण अधिकार वैमानिकाच्या हाती असतात. संबंधित वैमानिक विमानतळांच्या हद्दीनुसार हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्कात असतो. त्यामुळे एखादे विमान हवेत असताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, विमानतळ संचालकाकडे माहिती कळवली जाते. त्यासाठीदेखील डीजीसीए, संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक आहे.

परिस्थितीची खातरजमा करून विमानतळ संचालक आणि इतर परवानग्या घेतल्यानंतरच हवाई वाहतूक नियंत्रण विभागाला कळवले जाते. नियंत्रण कक्षाकडून थेट वैमानिकाला सूचना केल्या जातात, ज्याचे विमानचालकाला पालन करणे बंधनकारक असते,’ असे वंडेकर यांनी नमूद केले.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ‘गोल्डन पास’

‘राजकीय किंवा व्यावसायिक व्यक्तींना वारंवार देश-परदेशात दौरे असतात. अशा वेळी खासगी विमान कंपन्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘गोल्डन पास’ देतात. या अंतर्गत सवलत तसेच विशेषाधिकार प्रदान असतात. त्यानुसार, संबंधित विमान कंपन्या या व्यक्तींची माहिती कायमस्वरूपी एकत्रित करून परवानगीची प्रक्रिया दोन ते तीन तासांत करून देतात. त्यामुळे या व्यक्तींना खासगी विमानांनी सहज उड्डाण करता येते,’ असे धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.

Story img Loader