मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र पुलंच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे, असे मनोगत ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाराव्या पुलोत्सव तपपूर्ती सोहळ्यात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला शुक्रवारी पुल कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी डॉ. अवचट आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत घेतली.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेपासूनचा प्रवास डॉ. अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांनी यावेळी कथन केला. पु. ल. देशपांडे यांनी या कामाबद्दल सुचवले होते व त्यातून मुक्तांगणची सुरुवात झाली असे त्यांनी सांगितले. व्यसन म्हणजे सुख असते, अशी मान्यता आहे, या बाबत अवचट यांचे मत विचारल्यानंतर ज्या सुखाची नंतर किंमत मोजावी लागते ते कधीच सुख नसते, असे अवचट म्हणाले. पुलंच्या मदतीने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना झाली. पुरस्काराच्या निमित्ताने पुलंचे आशीर्वाद मिळत आहेत, असे पुणतांबेकर यांनी सांगितले.

मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र आज हा पुरस्कार मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे. मुक्तांगण काही सप्ततारांकित हॉटेलसारखी व्यवस्था देऊ शकत नाही; पण जे सप्ततारांकित हॉटेल देऊ शकत नाही, ती माया केंद्रातील रुग्णांना मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र देते. मुक्तांगणसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार मी अर्पण करतो, असेही अवचट यांनी सांगितले.

 

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award to muktangan institute