‘कथा- पटकथाकार के. अब्बास, अभिनेते बलराज सहानी आणि गीतकार साहिर लुधियानवी हे ज्या काळात लिहिते व कर्ते झाले तो काळ स्वातंत्र्य मिळवण्याचा व राष्ट्र घडवण्याचा होता. या त्रयींनी आपल्या कामाच्या माध्यमातून राष्ट्र घडवण्याच्या आड येणारे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले,’ असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
‘बलराज सहानी- साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे प्रसिद्ध कथा-पटकथाकार ख्वाजा अहमद अब्बास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि पटकथालेखक डॉ. अनिल सपकाळ यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. आनंद मोकाशी, संस्थेचे सचिव सुरेश टिळेकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळात वर्ग, जात, लिंगभाव आणि धर्म हे राष्ट्र घडवण्याच्या कामातील चार प्रमुख अडथळे होते. के. अब्बास, बलराज सहानी आणि साहिर लुधियानवी यांनी आपल्या लेखन  व निर्मितीच्या माध्यमातून विविध प्रयोग करत हे अडथळे दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याच प्रकारचा प्रयत्न सुमित्रा भावे व अनिल सपकाळ यांच्या कामात दिसतो.’’
‘अब्बास, सहानी आणि लुधियानवी यांच्यासाठी चित्रपटसृष्टी हे स्वप्ने विकण्याचे नव्हे, तर मानवी कथा सांगण्याचे व्यासपीठ होते,’ अशा भावना भावे यांनी व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,‘‘आपल्या स्वप्नातील भारताची रचना समोर ठेवण्यासाठी या त्रयींनी चित्रपट हे माध्यम वापरले. आजच्या धार्मिक व जातीय विद्वेषाच्या आणि वस्तूकरणाच्या युगात मन रिझवणारे आणि नवी जाणीवही देणारे चित्रपट बनवण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळते.’’
सपकाळ म्हणाले, ‘‘तळातील माणसापर्यंत जाऊन सामाजिक परिवर्तन करण्याची भूमिका अब्बास यांच्या लेखनात पाहायला मिळते. दलित व अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या काळात प्रत्येकाने आपली भूमिका तपासून पाहणे व त्यानुसार विधान करणे गरजेचे वाटते. या अनुषंगाने हा पुरस्कार महत्त्वाचा आहे.’’
पुरस्कार वितरणानंतर लुधियानवी यांच्या पुण्यातिथीनिमित्त मोकाशी यांनी ‘साहिर लुधियानवी एक महान शायर’  या दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण केले.’
 
 

 

Story img Loader