‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या वतीने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे चार पुरस्कार जाहीर झाले असून यंदाचे पुरस्कार गायक हेमंत पेंडसे, संगीतकार आशिष मुजुमदार, हार्मोनियम वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर आणि गायिका वैशाली सामंत यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभ १६ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार असून हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. ‘किराणा’ घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पेंडसे यांना शास्त्रीय आणि सुगम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा’ पुरस्कार देण्यात येणार आहे. सातत्यपूर्ण आणि स्पृहणीय कामगिरीबद्दल मुजुमदार यांना ‘केशवराव भोळे’ पुरस्कार देण्यात येत आहे. केवळ वादकासाठी असलेला ‘विजया गदगकर’ पुरस्कार चिपळूणकर यांना, तर सुगम संगीतातील भरीव कामगिरीबद्दल ‘उषा (अत्रे) वाघ’ पुरस्कार सामंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी वयाच्या ८० व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त प्रतिष्ठानतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर पुरस्कार विजेते आपली कला सादर करणार आहेत.
– ‘स्वरानंद’ प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
गायक हेमंत पेंडसे, संगीतकार आशिष मुजुमदार, हार्मोनियम वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर आणि गायिका वैशाली सामंत यांना ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या वतीने पुरस्कार जाहीर झाले आहेत.
आणखी वाचा
First published on: 06-12-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awards of swaranand pratishthan declared