गेली अनेक वर्षे दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांच्या कडकडाटाने शहर जागे होत असे. मात्र, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत शाळा-शाळांमधून होणाऱ्या जागराचा परिणाम आता दिसू लागला आहे. यावर्षी शासन निर्णय काढत शिक्षण विभागानेही या मोहिमेला हातभार लावला आहे.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायूप्रदूषण टाळण्यासाठी गेली अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांकडून जागृती करण्यात येत आहे. फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या लहान मुलांमध्येच जागृती करण्याच्या मोहिमेला आता हळूहळू यश मिळताना दिसत आहे. त्याला गेल्या काही वर्षांपासून शाळांनी हातभार लावला आहे. शिक्षण विभागानेही शाळांनाच नाही, तर महाविद्यालयांनाही फटाक्यांचा वापर कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘फटाक्यांच्या वापराच्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्याबाबत सूचना द्याव्यात,’ असे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले आहे.
शहरातील जवळपास सर्व शाळांमधून फटाक्यांचा वापर कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येते. दिवाळीची सुटी संपण्यापूर्वी शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेण्यात येते. अनेक शाळांनी सुटीपूर्वी दीपोत्सव साजरा करतानाच पर्यावरण जपण्याचा आणि प्रदूषण टाळण्याचा संदेश दिला जातो. काही शाळांमध्ये फटाक्यांच्या वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या सगळ्याचा परिणाम मुलांवर होत असल्याचे निरीक्षण आता पालकच नोंदवत आहेत. याबाबत पालक नीलिमा खरे यांनी सांगितले, ‘माझ्या मुलीच्या शाळेत फटाक्यांचा वापर न करण्याच्या सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या. माझी मुलगी लहान आहे, मात्र फटाके वाईट असतात हे मुलीच्या मनावर इतके बिंबले की फटाके आणण्यासाठी तिनेच नकार दिला.’

‘‘शाळांमध्ये आम्ही दरवर्षी फटाके न वापरण्याच्या सूचना मुलांना देतो. फटाक्यांचे दुष्परिणाम काय होतात, ते का टाळायचे, फटाके न उडवताही छान दिवाळी कशी साजरी करता येऊ शकते याची माहिती मुलांना देतो. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देतो. फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी केल्याचे मुलं येऊनही सांगतात. या वर्षी मुलांनी फटाक्यांचा वापर टाळण्याबाबत स्वाक्षरी मोहीम राबवली.’’
मधुलिका भुपटकर, मुख्याध्यापिका, गुरुकुल प्रशाला

Story img Loader