‘देशात कुपोषणाचे प्रमाण मोठे असून नवजात बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी मातांमध्ये स्तनपानाबद्दल जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. ससूनसारख्या रुग्णालयांनी स्तनपानाविषयी जनजागृती मोहीम राबवावी,’ अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
ससून सर्वोपचार रुग्णालयात बँक ऑफ बडोदाच्या आर्थिक सहकार्यातून मातृदुग्धपेढी सुरू करण्यात आली आहे. या पेढीचे सुळे यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या खडसे, आमदार बापू पठारे आणि बँक ऑफ बडोदाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ‘‘हल्लीच्या महिला बाळंतपणानंतर शरीर सुडौल राहावे यासाठी स्तनपानाला विरोध करतात. मात्र स्तनपान हा बाळंतपणानंतर आरोग्य उत्तम राहण्याचा एक उपचारच आहे. त्यामुळे इतर उपचार न घेताही बाळंतपणात वाढलेले वजन कमी होऊ शकते. ससूनने शहरातील मातांमध्ये नवजात बालकांना स्तनपान करण्याविषयी जनजागृती करायला हवी. देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थांमध्ये चांगले शिक्षण दिले जात असून सरकारतर्फे अशा संस्था टिकवण्यासाठी मदत दिली जाईल.’’
‘ससूनसारख्या संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संघटना तयार होऊ नयेत, कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्या चर्चेने सोडवल्या जाव्यात,’ असेही त्या म्हणाल्या.
डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘नवजात अर्भके, अनाथ बालके, एचआयव्हीग्रस्त मातांची एचआयव्हीची लागण न झालेली बालके या सर्वासाठी ही मातृदुग्धपेढी वरदान ठरणार आहे. नवजात बालकास नियमित स्तनपान केल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, संधीवात आणि कर्करोगापासूनही त्या महिलेस संरक्षण मिळते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा