भक्ती बिसुरे
व्यापक पातळीवर प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर
मानसिक आजार हे शरीराच्या आजारांएवढेच साहजिक आहेत आणि त्यांच्यावर उपचार केले असता ते बरे होऊ शकतात, हा संदेश ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील मासोपचार तज्ज्ञांनी गाव तिथे मानसोपचार ही चळवळ हाती घेतली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात नियमितपणे मानसिक आरोग्य आणि मानसोपचार या विषयावर काम करण्याचे नियोजन राज्याच्या कानाकोपऱ्यातील सुमारे सत्तर डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. ही चळवळ आणखी व्यापक पातळीवर नेण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. पुणे येथे कार्यरत असलेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील मानसोपचार विषयक सद्य:स्थिती चिंताजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. अनेक डॉक्टर व्यक्तिगत पातळीवर नैराश्य, संशय, न्यूनगंड या आजारांवर समुपदेशन आणि मानसोपचार हे काम ग्रामीण भागात करतात, मात्र चळवळीद्वारे त्याला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात जाऊन मानसिक आजारांबाबत माहिती देणे, उपचारांबाबत जागृती करणे, सातत्याने एकाच गावात किंवा दरवेळी वेगळे गाव निवडून तेथे हे डॉक्टर काम करणार आहेत. विविध उपक्रमांच्या मदतीने ग्रामीण भाग मानसिक आरोग्य साक्षर करणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे.
औरंगाबाद येथील डॉ. अमोल देशमुख म्हणाले, मानसिक आजार अद्याप ही ग्रामीण भागातील नागरिकांकडून स्वीकारले जात नाहीत. मानसिक आजारांचे स्वरूप माहीत नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग निवडला जातो आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. ही चळवळ रूजविण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे आणखी काही मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोहोचून त्यांना या चळवळीत सहभागी करून घेणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर येथील डॉ. देवव्रत हर्षे म्हणाले, शॉक ट्रीटमेंटची स्वीकारार्हता, डॉक्टरांवर विश्वास अशा काही बाबतीत ग्रामीण भागातील चित्र सकारात्मक आहे. आजाराचे स्वरुप मानसिक आहे या गोष्टीचा स्वीकारही शहरी भागापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गाव तिथे मानसोपचार ही चळवळ तेथे परिणामकारक ठरेल.
सामाजिक जाणीव स्वागतार्ह!
देशभरात केवळ चार ते साडेचार हजार एवढे मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. इतर आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचे देशातील प्रमाण व्यस्त आहे. मानसोपचार तज्ज्ञ ग्रामीण भागात पोहोचू शकत नाहीत त्यामुळे मानसिक आजारांबाबतचे गैरसमज (स्टिग्मा) दूर करणे अवघड असते, शहरी भागातील मानसोपचार तज्ज्ञांची या चळवळीमागील सामाजिक जाणीव स्वागतार्ह असून, ‘इंडियन सायकियाट्रिक सोसायटी’ याबाबत सर्व ते सहकार्य करेल असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.