एकीकडे आधुनिक वैद्यकशास्त्र पुराव्यांच्या आधारावर आपली सिद्धता पटवून देत असताना आणि अनुभवसिद्ध आयुर्वेदाची उपेक्षा होत असलेल्या काळातही ‘आयुर्वेद रसशाळा’ ठामपणे उभी राहिली, रुजली आणि वाढलीही. आयुर्वेदिक औषधांच्या सततच्या जाहिरातींच्या माऱ्यातही पुण्याचा ‘ब्रँड’ झालेल्या रसशाळेने स्वत:चे असे अढळ स्थान मिळवले. पारंपरिक ज्ञानाच्या साहाय्याने आपल्या शास्त्रात भर घालतानाच आधुनिक काळाच्या गरजांशी जुळवून घेणे व त्याच वेळी आपली मूळची सचोटी न सोडणे अशा तिहेरी कसरतीतच त्यांचे यश आहे.
आयुर्वेद रसशाळा म्हणजे काय, या प्रश्नाला केवळ ‘आयुर्वेदिक औषधे बनवणारी संस्था’ असे उत्तर देऊन चालणार नाही. आयुर्वेदिक औषधांच्या कंपन्या कमी नाहीत. आयुर्वेदिक डॉक्टर वापरत असलेल्या औषधांपासून प्रसारमाध्यमांमधून ‘अमुकतमुक आजार कोणत्याही ‘साइड इफेक्ट्स’शिवाय पूर्णत: बरा करा,’ असे अचाट दावे करणाऱ्या ‘तथाकथित’ औषधांपर्यंत सर्व गोष्टी आज बाजारात आहेत. अशा स्थितीत आयुर्वेद रसशाळेचे वेगळेपण जाणून घेण्यासाठी आपल्याला या संस्थेच्या मुळाशी जावे लागेल.
‘राष्ट्रीय शिक्षण मंडळ’ या ट्रस्टचा एक भाग असलेले टिळक आयुर्वेद महाविद्यालय १९३३ मध्ये सुरू झाले आणि या महाविद्यालयाला संलग्न असलेले शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालयही नंतर स्थापन करण्यात आले. या रुग्णांसाठीची आयुर्वेदिक औषधांची गरज मोठी होती, शिवाय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात शास्त्रशुद्ध औषधनिर्माण हा विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही तशी सोय उपलब्ध करणे गरजेचे होते. हे काम १९३५ मध्ये सुरू झालेल्या आयुर्वेद रसशाळेने केले.
एका बाजूस आधुनिक वैद्यकीय शिक्षणात विविध प्रयोग होत असलेला तो काळ. नवीन प्रतिबंधक लसी शोधल्या जात होत्या, शवविच्छेदन पद्धतीही चांगली विकसित झाली होती. आधुनिक वैद्यकशास्त्र पुराव्यांच्या आधारावर आपली सिद्धता पटवून देत असताना अनुभवसिद्ध असलेला आपला आयुर्वेद मात्र बाजूला पडत होता. पूर्वापार चालत आलेल्या औषधांव्यतिरिक्त मधल्या जवळपास शंभर वर्षांत आयुर्वेदात फारशी प्रगतीच होऊ शकली नव्हती. अशा काळात रसशाळेच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक असलेले वैद्य भा. वि. ऊर्फ मामा गोखले यांनी त्यांच्या अनुभवातून विविध आयुर्वेदिक कल्पांची निर्मिती केली आणि नंतर त्यांना ‘प्रोप्रायटरी प्रॉडक्ट’ म्हणून मान्यता मिळाली. त्यांच्यासह आणि नंतरही अनेक नामांकित वैद्यांनी रसशाळेच्या कार्याला आपला हातभार लावला. ‘आयुर्वेदिक औषधे केवळ पूर्वापार चालत आली व काळाच्या ओघात टिकून राहिली म्हणून ती चांगली,’ हे स्पष्टीकरण आधुनिक विचाराला पटण्यासारखे नाही, हे रसशाळेने त्यानंतरही कायम ध्यानात ठेवले, नव्हे, ते त्यांचे वैशिष्टय़च ठरले.
औषधाची किंमत वाढली तरी चालेल, पण त्याचे मूळ द्रव्य, औषधप्रक्रिया आणि अंतिम उत्पादन यात शास्त्रीय निकष कुठेही डावलायचे नाहीत, हे ब्रीद रसशाळेने कायम पाळले. अनेक आयुर्वेदिक घटकद्रव्ये पुरेशा प्रमाणात व उत्तम दर्जाची उपलब्धच न होण्याच्या सध्याच्या काळातही त्यांचा हा बाणा कायम आहे. ‘अनेकदा औषधीद्रव्ये कमी किमतीत मिळतातही, परंतु ती आम्ही अजिबात वापरत नाही. जी द्रव्ये वापरतो ती रीतसर पावती घेऊन खरेदी केलेली असतात,’ असे रसशाळेचे डॉ. वि. वि. डोईफोडे सांगतात.
आणखी एक उदाहरण आयुर्वेदातील आसवे व अरिष्टांचे देता येईल. जसे मद्य जितके जुने तितके चांगले असे म्हटले जाते, तशीच ही आसवे-अरिष्टेही काही काळ जुनी करून मगच वापरावी लागतात. या औषधांच्या निर्मितीत त्यात आपोआप अल्कोहोल तयार होते. त्यामुळे तो काढा अधिक काळ टिकतो आणि शरीराला त्याचा योग्य उपयोग होण्याच्या दृष्टीनेही ते गरजेचे असते. आसवात अल्कोहोल तयार होण्यासाठी किमान तीन महिने लागतात. पण आयुर्वेदातील बऱ्याच उत्पादक कंपन्या केवळ पंधरा दिवसांत वा तीन आठवडय़ांतही औषध विक्रीस आणत असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. या वेळेच्या बाबतीत रसशाळा कोणतीही तडजोड तर करत नाही. रसशाळेत ही औषधे तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची लाकडी बॅरल्स वापरली जातात आणि दर पंधरा दिवसांनी त्याच्या चाचण्याही केल्या जातात.
औषधांच्या उत्पादन प्रक्रियेत काळानुरूप बदल करणे, आवश्यक त्या ठिकाणी यंत्रांचाच वापर करणे, हेही रसशाळेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. जाहिरात हे या युगाचे गमक. त्यातही आयुर्वेदिक औषधांच्या आणि केवळ ‘आयुर्वेदिक’ या नावाखाली खपवल्या जाणाऱ्या तथाकथित औषधांच्या जाहिराती आपल्याला नवीन नाहीत. यात आयुर्वेद रसशाळेच्या औषधांची जाहिरात मात्र सहसा बघायला मिळत नाही. जाहिराती करण्यापेक्षा वैद्यांपर्यंत आणि आयुर्वेदिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांना औषधांबाबत माहिती देणे, आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील रुग्णांना माफक दरात औषधे पुरवणे या गोष्टी त्यांना अधिक महत्त्वाच्या वाटतात. ‘प्रशम’, ‘रसदंती’, ‘रसगंधा’, ‘सूक्ष्मत्रिफळा’, ‘कुंभजतू’ असे रसशाळेचे विविध कल्प मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. ‘शतावरी कल्प’, कनोजचा प्रवाळयुक्त गुलकंद, ‘वरुणादी क्वाथ’, मधुमेहासाठी वापरले जाणारे ‘आसनाद’ हेही लोकप्रिय आहेत. ‘डायबेटिस शंभर टक्के बरा करणारे’ किंवा ‘कर्करोग समूळ नष्ट करणारे औषध’ असे अचाट दावेही त्यांनी आपल्या औषधांबाबत कधी केले नाहीत.
पुण्याबाहेर दिल्ली, जोधपूर, बेळगाव आणि गोव्यात रसशाळेची गोदामे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आर्क ऑफ युरोप गोल्डन स्टार’, ‘आर्क ऑफ युरोप डायमंड स्टार’, ‘प्लॅटिनम स्टार ऑफ माद्रिद’, ‘आयसेन मेक्सिको अॅवॉर्ड’ अशी विविध पारितोषिकेही त्यांनी वेळोवेळी पटकावली. पारंपरिक ज्ञानाच्या साहाय्याने आपल्या शास्त्रात भर घालतानाच आधुनिक काळाच्या गरजांशी जुळवून घेणे व त्याच वेळी आपली मूळची सचोटी न सोडणे अशी तिहेरी कसरत रसशाळेने केली. आजच्या औषधांच्या जाहिरातींचा सततचा मारा होण्याच्या जगात रसशाळा इतरांपेक्षा वेगळी ठरते यातच त्यांचे यश आहे.
संपदा सोवनी – sampada.sovani@expressindia.com