‘आयुर्वेदाचा विस्तार आणि आवाका जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या शास्त्राची कालसापेक्षता प्रयोगांच्या कसोटीवर पारखून सिद्ध करून दाखवणे आवश्यक आहे,’ असे मत ‘लोकसत्ता’चे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार वैद्या शुभदा पटवर्धन यांना कुबेर यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. तसेच इतर १२ जणांना आयुर्वेदातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. वैद्य भि. के. पाध्येगुर्जर, संस्थेचे अध्यक्ष वैद्य स. प्र. सरदेशमुख, विश्वस्त प. य. वैद्य खडीवाले, कार्यकारी विश्वस्त श. ह. भिडे या वेळी उपस्थित होते.
वैद्य पवनकुमार गोदटवार, वैद्य भरत राठी, वैद्य संजय तळगावकर, वैद्य समर्थ कोटस्थाने, वैद्य सुबोध पाटील, वैद्य राजेंद्र अमीलकंठवार, वैद्य विजय पात्रीकर, वैद्य प्रदीप आवळे, वैद्या वैशाली नागले, वैद्य संजय माळी, वैद्या वीणा देव, दिगंबर मोकाट यांना या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.      
कुबेर म्हणाले, ‘‘आयुर्वेदाच्या पुढील प्रवासाला जागतिक परिमाण आहे. जगाच्या बाजारपेठेचे नियम मान्य करत आयुर्वेदाची कालसापेक्षता सिद्ध करण्याची आज गरज आहे. जागतिक स्तरावर उत्पादनाचा बौद्धिक संपदा हक्क आणि उत्पादनाच्या निर्मितीप्रक्रियेचा बौद्धिक संपदा हक्क अशा बाबतीत शास्त्रीय पातळीवर उत्तर देण्याची ताकद आपण दाखवली नाही. ‘आयुर्वेदाचे कोणतेच दुष्परिणाम नसतात,’ यासारखे समज बाळगून केलेले अंधानुकरणही आयुर्वेदाच्या विकासाला मारकच ठरले. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधांमध्ये मूळ औषधी घटकांचा समावेश न करताही ते सर्रास विकले जात असल्याचे आढळते. हे या शास्त्राचे नुकसान आहे. आयुर्वेदातील दावा शास्त्रीय कसोटीवर पारखून सिद्ध करता यावा यासाठी प्रयोग होऊन त्यांच्या नोंदी ठेवल्या जाणे आवश्यक आहे.’’