संजय जाधव
राज्यातील आघाडीच्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेले बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या स्वीय सहायकपदी (पीए) एका आयुर्वेदिक डॉक्टरला नेमण्यात आले आहे. ससूनच्या प्रशासनाने ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचे म्हटले असून, अधिष्ठात्यांच्या नावाने हा पीए निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचे अजब नमुने वारंवार समोर येत आहेत. रुग्णालयात आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग आहे. त्यात दोन आयुर्वेदिक डॉक्टरांची पदे आहेत. या डॉक्टरांनी आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग सांभाळून उरलेल्या वेळेत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम करणे अपेक्षित आहे. हे तृतीय श्रेणीचे पद असून, ते कंत्राटी आहे. सध्या या दोन्ही जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> न्यायालयातून कारागृहात नेलेल्या कैद्याकडे अमली पदार्थ सापडले; बंदोबस्तास असलेल्या पोलिसांवर संशयाची सुई
रुग्णालयात एक आयुर्वेदिक डॉक्टर बाह्य रुग्ण विभाग सांभाळून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम सांभाळत आहे. दुसऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरला थेट अधिष्ठात्यांच्या कार्यालयात नेमणूक देण्यात आली आहे. त्यांचे नाव मानसिंग साबळे असे आहे. साबळे हे कंत्राटी पद्धतीने कामावर असून, त्यांना १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्त देता येत नाही. त्यामुळे त्यांना १२० दिवसांची नियुक्ती देण्यात येत आहे. हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा १२० दिवसांसाठी त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जात आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यांच्यावर अधिष्ठात्यांच्या स्वीय सहायकाची जबाबदारी अनधिकृतपणे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे: दारूच्या नशेत मित्रांना आई, बहिणीवरून दिल्या अश्लील शिव्या; मित्रांनी केली हत्या
विशेष म्हणजे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साबळे यांची नियुक्तीच नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. अधिष्ठात्यांना अशा प्रकारे स्वीय सहायक नेमण्याचा अधिकार नाही. आयुर्वेदिक डॉक्टरच्या दोन जागा असून, त्यांचे कामही ठरलेले आहे. मात्र, राजकीय आशीर्वादातून साबळे यांना अभय दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
अधिष्ठाता नको, पण पीएला आवरा!
अधिष्ठात्यांच्या नावाखाली साबळे हे डॉक्टर, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर अधिकार गाजवत आहेत. अधिष्ठात्यांची नाराजी नको, म्हणून अनेक जण साबळे यांच्या आदेशानुसार वागत आहेत. याच वेळी अधिष्ठात्यांच्या कार्यालयात बसून त्यांच्या नावाने साबळे हेच अनेक निर्णय घेत आहेत, असा दावाही सूत्रांनी केला.
भाजप नेत्याच्या पीएचे कनेक्शन
तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री व भाजप नेत्याच्या स्वीय सहायकामुळे साबळे यांची अधिष्ठाता कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून भाजप नेत्याच्या स्वीय सहायकाचा ससून आणि बीजेच्या कामकाजात हस्तक्षेप सुरू आहे. या भाजप नेत्याकडून वैद्यकीय शिक्षण खाते गेले, तरी साबळे यांच्या रूपाने त्यांच्या स्वीय सहायकाने प्रशासनावर आपला अंकुश ठेवला आहे. याच वेळी साबळे हे भाजप नेत्याच्या स्वीय सहायकाचा नातेवाईक असल्याचे सगळ्यांना सांगत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मानसिंग साबळे यांची नियुक्ती आधीच्या अधिष्ठात्यांच्या कार्यकाळात झाली होती. ती नियुक्ती तशीच पुढे सुरू ठेवण्यात आली. प्रशासकीय सोईनुसार साबळे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. आयुर्वेदिक विभागात गरज असल्यास साबळे यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवले जाईल. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय