पुणे – आयुर्वेदातील पारंपरिक उपचारांचा लाभ देशातील छावणी रुग्णालयातील रुग्णांना देण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यासाठी देशातील ३७ छावणी रुग्णालये निश्चित करण्यात आली असून महाराष्ट्रातील खडकी आणि देहूरोड या दोन छावणी रुग्णालयांचा समावेश आहे.
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी आणि सामान्य नागरिकांना आयुर्वेदिक उपचार मिळणार आहेत.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमासाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे याबाबत माहिती देण्यात आली आहे.