वेगळ्या वाटेने जाणाऱ्या कविता आणि गीतांची घरगुती मैफल एवढेच स्वरूप असलेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामध्ये आयुष्यावर बोलता बोलता दहा वर्षे कशी सरली हे समजलेच नाही. रसिकांच्या प्रेमामुळेच या कार्यक्रमाची दशकपूर्ती होत आहे. कवितेवर अलोट प्रेम करणाऱ्या रसिकांनीच आम्हाला घडविले.. ही भावना आहे कवी संदीप खरे आणि संगीतकार-गायक डॉ. सलिल कुलकर्णी!
‘जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ असे म्हणत कवितांची सुरेल मैफल साकारणाऱ्या सलिल-संदीप यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून शनिवारी (३ ऑगस्ट) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा ते रात्री साडेबारा असा ‘आयुष्यावर..’चा दशकपूर्ती कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संदीप म्हणाला, हे यश खरे तर अनपेक्षित असेच आहे. पहिला कार्यक्रम केला तेव्हा दुसरा करूच असे काही ठरविले नव्हते. गंमत म्हणून केलेला कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला आणि ती मालिका सुरूच आहे. हा प्रवास सहजसुंदर आणि आनंददायी असाच आहे. हा कार्यक्रम सुरू करताना कोणताही अट्टहास किंवा अभिनिवेश नव्हता आणि आजही तो नाही. अजूनही आमच्या कविता सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रसिक तोच आनंद घेतात. आम्हालाही कलावंत म्हणून अभिव्यक्त होण्याची गरज होती. ती आयुष्यावर कार्यक्रमाने पूर्ण केली. ९५० कार्यक्रम करताना जगभरातील रसिकांचा प्रतिसाद लाभला आहे. प्रत्येक कार्यक्रमात नवीन कविता आणि गीतांच्या सादरीकरणामुळे हा कार्यक्रम न राहता प्रयोग झाला आहे.
सलिल म्हणाला, रसिकांनी आमच्या प्रत्येक प्रयोगाला शाबासकी आणि प्रेम दिले. मराठी माणूस ‘नॉस्ट्रॅल्जिया’ मध्ये म्हणजेच स्मरणरंजनामध्ये रमतो हा समज या कार्यक्रमाने खोटा ठरविला. प्रत्येक कार्यक्रमातील नव्या कवितांच्या समावेशाने त्याचे ताजेपण टिकून राहते. ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ ऐकल्याशिवाय न झोपणारी मुले असोत किंवा कविता-गाणी ऐकणारी पिढी सर्वानी आमच्यावर मनापासून प्रेम केले.
रसिकांच्या प्रेमामुळेच ‘आयुष्यावर बोलू काही’ची दशकपूर्ती – सलिल-संदीप यांची भावना
‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामध्ये आयुष्यावर बोलता बोलता दहा वर्षे कशी सरली हे समजलेच नाही. कवितेवर अलोट प्रेम करणाऱ्या रसिकांनीच आम्हाला घडविले.. ही भावना आहे कवी संदीप खरे आणि संगीतकार-गायक डॉ. सलिल कुलकर्णी!
आणखी वाचा
First published on: 02-08-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyawar bolu kahi completed 10 years with compliments from appreciators