लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेचे वेळापत्रक मागील दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. दररोज धावणारी ही गाडी मे आणि जून महिन्यात तब्बल ४२ वेळा वेळापत्रकातील बदलांसह धावली. याचबरोबर ही गाडी या दोन महिन्यांत तीन वेळा रद्द झाली आहे. नुकतीच आझाद हिंद एक्स्प्रेस एक दिवस उशिराने पुण्यात दाखल झाल्याचा प्रकारही घडला होता.
पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मे महिन्यात २० वेळा बदल करण्यात आला. मे महिन्यात ही गाडी दोन वेळा रद्द करण्यात आली. जूनमध्ये गाडीच्या वेळापत्रकात २२ वेळा बदल करण्यात आला तर ती एकदा रद्द करण्यात आली. गाडीचे वेळापत्रक बदलणे अथवा ती रद्द करण्याचे प्रकार दोन महिन्यांत ४५ वेळा घडले आहेत. गाडीचे वेळापत्रक बदलणे अथवा ती रद्द करण्याचे प्रमाण एकूण ७५ टक्के, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
आणखी वाचा-पुणे: रिंग रोड प्रकल्पबाधितांसाठी खुशखबर: मुदतीत जमीन दिल्यास मिळणार ‘एवढा’ मोबदला
गाडीच्या वेळापत्रकात सातत्याने बदल केला जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा महिनाभर आधी नियोजन करूनही त्यावर पाणी फेरले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ही अनेक रेल्वे विभागांतून प्रवास करते. त्यातील बिलासपूर आणि रायपूर विभागांमध्ये रेल्वेची अनेक कामे सुरू आहेत. त्यामुळे गाडीला अनेक वेळा विलंब होत आहे.
पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस
महिना – वेळेत बदल – रद्द
जानेवारी – ११ – ००
फेब्रुवारी – ०० – ००
मार्च – ०८ -००
एप्रिल – ०७ – ०४
मे – २० – ०२
जून – २२ – ०१