पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी मुरुड येथील समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्यानंतर आझम कॅम्पस परिसरात शोककळा पसरली. सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तेथे धाव घेतली. एकमेकांना धीर देणाऱ्या पालकांच्या हुंदक्यांमुळे परिसरात शोककळा पसरली.
लष्कर परिसरातील महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन सोसायटीच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या शास्त्र आणि संगणक शास्त्र शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांतील विद्यार्थी सोमवारी मुरुड-जंजिरा येथे सहलीसाठी गेले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या मुमारास मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर खेळणारे विद्यार्थी पोहायला उतरले. त्याचवेळी भरती सुरू होती. अंदाज न आल्याने विद्यार्थी पाण्यात बुडाले. विद्यार्थ्यांसोबत गेलेल्या शिक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि त्यांनी तातडीने ही माहिती स्थानिक नागरिक व पोलिसांना दिली. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून तेरा विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतांमध्ये सात विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण चौदा विद्यार्थी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले असून एका विद्यार्थ्यांचा अद्याप शोध लागला नाही.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पालकांनी या शैक्षणिक संस्थेत धाव घेतली. एकमेकांना आधार देत पालकांनी नेमके किती विद्यार्थी या दुर्घटनेत बुडाले, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धक्का बसला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, विश्वस्त एस. ए. इनामदार, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शैला बुटवाला यांनी पालकांना धीर देत तेथील मदतकार्याविषयी माहिती दिली. त्यावेळी अनेक पालकांना अश्रू आवरता आले नाही.
सोमवारी सकाळी तीन बसमधून १२५ विद्यार्थी एकदिवसीय सहलीसाठी मुरुड येथे रवाना झाले होते. सायंकाळी ते परतणार होते. त्यांच्यासोबत आठ शिक्षक आणि तीन कर्मचारी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तेथे संस्थेने रुग्णवाहिका पाठविल्या असून प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. या दुर्घटनेत एक विद्यार्थी बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. तेथील कार्यकर्त्यांंनी विद्यार्थी आणि शिक्षकांना धीर देऊन मदतीचा हात दिला आहे. काही विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. त्यांनाही आम्ही धीर दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा