पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा शहराध्यक्षपद भूषविलेले आझम पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री उशीरा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पिंपरीमध्ये राष्ट्रवादीला तसेच पवार काका-पुतण्यांना जोरदार धक्का बसला आहे. याआधी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, पक्षनेता आणि दोन वेळा शहराध्यक्ष अशी पदे आझम पानसरे यांनी भूषविली. १९९९ साली त्यांनी हवेली विधानसभेची तर २००९ साली मावळ लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीत नाराज होते. नुकत्याच झालेल्या पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असा त्यांना विश्वास होता. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार अनिल भोसले यांनाच उमेदवारी दिली होती. तेव्हाच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी गुफ्तगू सुरू केले. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही जुने राजकीय वैर विसरून पानसरे यांच्या प्रवेशाला संमती दिली. त्यानंतर चर्चेच्या अनेक फेरी अखेर रविवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर त्यांचा प्रवेश संपन्न झाला. पानसरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam pansare bjp devendra fadnavis ncp mahesh landge pimpri chinchwad