राज्यातील ‘दादा’ मंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या आझम ‘भाई’ पानसरे यांनी काँग्रेस प्रवेशानंतरच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांच्या पिंपरी बालेकिल्ल्यात काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकेकाळी शहरावर काँग्रेसचे राज्य होते, याची आठवण करून देत आपापसात न भांडता एकजुटीने काम केल्यास काँग्रेसचे गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काळेवाडीतील अविनाश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रदेश सचीव सचीन साठे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, महिलाध्यक्षा ज्योती भारती, नगरसेवक गौतम चाबुकस्वार, आरती चोंधे, विमल काळे, गीता मंचरकर, कविचंद भाट, मनोज कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक विजय लांडे, विनायक रणसुभे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पानसरे म्हणाले, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. काँग्रेस पक्ष वाढवायचा असल्यास बऱ्याच सुधारणा करायला हव्यात. आपापसातील हेवेदावे मिटवण्याची गरज असून आकस न ठेवता एकजुटीने काम केले पाहिजे. कशात काही नसताना आपण का भांडतो, याचे आत्मपरीक्षण व्हावे. विखुरलेली ताकद एकत्र आल्यास काहीही शक्य आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हाताच्या पंजावर कोणताही उमेदवार निवडून येत होता. आता राष्ट्रवादीची शहरात ताकद वाढली असून पालिकेत ९२ नगरसेवक आहेत. उमेदवारी एकाला व ताकद दुसऱ्याला, अशी नीती असलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोराला निवडून आणणे एवढेच काम आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांशी त्यांना काहीही घेणं-देणं नाही. लोकसभेला उमेदवार मिळत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा