उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या आझम पानसरे यांना आता आमदारकीची ‘प्रतीक्षा’ आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणासाठी पानसरे यांना ताकद देण्याचे काँग्रेसचे धोरण असून पानसरे यांना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच घेतला आहे. मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व म्हणून पानसरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचा ताकदीचा नेता म्हणून पानसरे यांच्याकडे पाहिले जात होते. तथापि, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तेव्हापासून ते राष्ट्रवादी सोडण्याच्या मन:स्थितीत होते. प्रत्यक्ष निर्णय त्यांनी यंदाच्या लोकसभेच्या तोंडावर घेतला. आपल्या पराभवास हातभार लावणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना मावळची उमेदवारी मिळण्याची चिन्हे असताना पानसरेंनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीशी दोन हात करू पाहणाऱ्या काँग्रेसची शहरातील अवस्था दयनीय आहे. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर वगळता शहरभर माहिती असलेला दुसरा नेता काँग्रेसमध्ये नाही. पानसरे यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षाची ताकद वाढेल, असे काँग्रेस नेत्यांचे गणित आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द देण्यात आला आहे. राज्यपालनियुक्त सदस्यांमध्ये पानसरे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते. पानसरे यांच्याशिवाय अनेकांनी फिल्िंडग लावली आहे. तथापि, अजितदादांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याच्या हेतूने पानसरे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
आझम पानसरे यांना आमदारकीची ‘प्रतीक्षा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या आझम पानसरे यांना आता आमदारकीची ‘प्रतीक्षा’ आहे.
First published on: 27-05-2014 at 02:57 IST
TOPICSविधान परिषद
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam pansare expects mla for legislative council