उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या आझम पानसरे यांनी आघाडीचा धर्म म्हणून होणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संयुक्त बैठकांपासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी ‘असहकार’ सोडून राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी होण्याची तयारी दाखवली असताना पानसरे यांची ‘अलिप्तता’ पाहता दोहोंची परस्परविरोधी भूमिका असल्याचे चित्र पुढे आले आहे.
राष्ट्रवादीचे ताकतीचे नेते म्हणून ओळखले जाणारे पानसरे मावळ लोकसभेसाठी लक्ष्मण जगतापांची उमेदवारी जाहीर होण्याची चिन्हे असतानाच पक्षांर्तगत वादातून ते बाहेर पडले. तथापि, राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून जगतापांनी मनसे व शेकापच्या पाठिंब्यावर रिंगणात उडी घेतली. त्यानंतर, अनेक ठिकाणी पानसरे व जगतापांचे ‘वाक्युद्ध’ दिसून आले. राष्ट्रवादीने ‘आयात’ राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानंतर आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसला सोबत घेण्याची प्रक्रिया राष्ट्रवादीकडून होऊ लागली. तथापि, सुरुवातीला भोइरांनी ताठर भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला सहकार्य नाही, असा पवित्रा अगदी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्यासमोरही त्यांनी घेतला. राष्ट्रवादीच्या विविध उद्योगांचा ‘पर्दाफाश’ करत भोइरांनी नकारार्थी सूर कायम ठेवला. पण नंतर, अचानक मवाळ होत राष्ट्रवादीशी सहकार्य करण्यास ते तयार झाले. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना ‘अडचण’ होऊ नये म्हणून भोइरांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार नरमाईचे धोरण स्वीकारले. यासंदर्भात, अजितदादांनी दूरध्वनी केल्याने त्यांचे मनपरिवर्तन झाल्याचेही सांगण्यात येते. या घडामोडीत आझम पानसरे मात्र कुठेच नाहीत. त्यांना राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. त्यामुळे आघाडीच्या बैठकांना आपणास बोलावू नये, अशी स्पष्ट ताकीद त्यांनी दिली आहे. दिलीप वळसे वगळता अन्य कोणत्याही नेत्याच्या संयुक्त बैठकीला ते आले नाहीत. बुधवारी नार्वेकरांचा उमेदवारीअर्ज भरण्यासाठी अजितदादा, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव अशी बडी मंडळी असतानाही ते फिरकले नाहीत. भोईर व पानसरे यांच्यात आघाडी धर्माविषयी परस्परविरोधी मतप्रवाह आहे. पानसरे यासंदर्भात कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत. भोइरांनी आकुर्डीत पत्रकारांना सांगितले, की पानसरे आघाडी धर्माचे पालन करतील, पक्षनेत्यांच्या तशा सूचना आहेत. आमच्यात गट-तट तसेच रुसवे-फुगवेही नाहीत. मी उपस्थित आहे, याचाच अर्थ पानसरे हजर आहेत, असे समजून चला. पानसरे माझे मोठे बंधू आहेत. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत, असे सक्रिय भोइरांनी स्पष्ट केले. तरीही पानसरे यांची अलिप्तता सूचक मानली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा