सविनय कायदेभंग या आयुधाचा वापर करूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे हत्यार मूल्य म्हणून रुजविले गेले तर नाहीच, पण खतपाणी देऊन वाढविण्याचा प्रयत्न देखील झाला नाही. याउलट समाजाची वाटचाल सनातनतेकडेच चालली आहे. विज्ञानाचा झपाटा होऊनही सनातनपणाची ही मगरमिठी सुटत नाही. आता काळ कठीण आला आहे. समाजवाद राजकारणापुरताच वापरला जातोय.!
ही व्यथा आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांची. केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारकडे निखालस बहुमत आहे, पण केवळ ३० टक्केच मते मिळाली असल्यामुळे सरकारकडे जनमत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बालवयातच पितृछत्र हरपलेला मुलगा प्रतिकूलतेवर मात करीत आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन एकाच वेळी वैद्यकीय सेवेबरोबर समाजसेवा करीत रंजल्यागांजल्या तळातील माणसांचा खऱ्या अर्थाने ‘बाबा’ झाला. डॉ. बाबा आढाव हे रविवारी (१ जून) वयाच्या ८५व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. नाना पेठेतील वारकरी संप्रदायाच्या घरात जन्मलेल्या बाबांनी माणसातील देवाची पूजा बांधली. आपल्याकडे ५० वर्षे वारी करणारे वारकरी आहेत, पण अर्धशतकाहून अधिक काळ कष्टकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या बाबांनी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंत ५४ वेळा तुरुंगाच्या वाऱ्या केल्या आहेत. बाबांनी स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तिसंग्रामत सहभाग घेतला आहे. लख्ख स्मरणशक्तीची प्रचिती देत कष्टकऱ्यांच्या विविध लढय़ांविषयी जणू ते कालपरवाच घडलेत अशा तऱ्हेने भरभरून बोलणारे बाबा या वयातही तरुणाला लाजवेल अशा तडफेने आणि त्याच पोटतिडकीने काम करतात. असंघटित कष्टकऱ्यांना संघटित करून वयोवृद्धांना निवृत्तिवेतन देण्यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा लागू व्हावा ही त्यांची धडपड सुरू आहे.
शालेय वयात इंग्रजांनी विजयाबद्दल वाटलेले पेढे फेकून आम्ही विद्यार्थ्यांनी दाखविलेली राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आणि साने गुरुजी यांचा असलेला प्रभाव, वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क भरण्यासाठी पुणे नगरपालिकेमध्ये केलेली तीन आठवडय़ांची नोकरी, शिक्षण घेताना भाववाढविरोधी आंदोलनातील सहभागाबद्दल घडलेला पहिला तुरुंगवास, महापालिकेमध्ये दोनदा भूषविलेले नगरसेवकपद, नाना पेठेमध्ये दवाखाना चालवीत असताना हमालांशी आलेला संबंध आणि असंघटित हमालांची मोट बांधण्याच्या उद्देशातून जन्माला आलेली हमाल पंचायत, हडपसर येथील दवाखान्याचे महाराष्ट्र आरोग्य मंडळ या न्यासामध्ये झालेले रूपांतर, पानशेत प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद, यशवंतराव चव्हाण यांच्या गाडीपुढे आडवे होऊन उधळलेले कुकडी भूमिपूजन, संसदीय निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होण्याचा १९७१मध्ये घेतलेला निर्णय आणि ‘एक गाव एक पाणवठा’ आंदोलनानंतर डॉक्टरी व्यवसाय न करण्याचा घेतलेला निर्णय अशा घटनांना बाबांनी जणू नुकत्याच घडल्यात अशा रीतीने उजाळा दिला.
कामगार संघटनेने सामान्यांशी नाळ जोडली पाहिजे असे एस. एम. जोशी नेहमी सांगत असत. हे ध्यानात घेऊन कष्टाची भाकर हे केंद्र हमाल पंचायतीकडे दिले. यामध्ये अल्प दरामध्ये दररोज १० हजार लोकांचे पोट भरते याचा मला आनंद असल्याचे बाबा आढाव यांनी सांगितले. घटनेचा ढाचा, राजकारणाचा साचा आणि समाजाची मानसिक अवस्था यांची नाळ जोडली गेली नाहीतर खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आपली धारणा असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजाची वाटचाल सनातनतेकडेच होतेय!
समाजाची वाटचाल सनातनतेकडेच चालली आहे. विज्ञानाचा झपाटा होऊनही सनातनपणाची ही मगरमिठी सुटत नाही. आता काळ कठीण आला आहे. समाजवाद राजकारणापुरताच वापरला जातोय.!
First published on: 31-05-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba adhav anniversary orthodox community