महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८५० मध्ये जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. आजही आपल्या समाजात जातींना गोंजारले जात असून या देशामध्ये जातीअंताच्या लढय़ाला अद्याप सुरूवात झालेली नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केली. फुले दाम्पत्याने कर्मकांडाविषयी आवाज उठविला होता. त्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचला गेला, असेही त्यांनी सांगितले.
‘संवाद पुणे’ संस्थेतर्फे रामनाथ चव्हाण यांनी लिहिलेले ‘सत्यशोधक महात्मा’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. हे औचित्य साधून समता भूमी येथील महात्मा फुले वाडा येथे या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, प्रकाशक नवीन इंदलकर, संस्थेचे सुनील महाजन, निकिता मोघे, या नाटकाचे दिग्दर्शक योगेश सोमण या वेळी उपस्थित होते. या नाटकामध्ये गणेश इनामदार महात्मा फुले यांची, तर, सई कोलते सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे.
डॉ. बाबा आढाव म्हणाले,की सावित्रीबाईंनी जातीव्यवस्थेविरोधात बंडखोरी केली होती. फुले यांनी त्या काळात सर्व ताप सहन केले. मात्र, प्रत्येक गोष्ट अंत:करणापासून केली. त्यांचे जीवन पारदर्शी होते. राखीव जागांचे आरक्षण राज्य घटनेमध्ये दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशभरातील लोकांना माहीत आहेत. मात्र, त्यातुलनेत परप्रांतामध्ये फुले यांचे कार्य अद्यापही पोहोचलेले नाही. त्यामुळे हे नाटक केवळ मराठीपुरते मर्यादित राहू नये.
सुरेश देशमुख म्हणाले,की सध्याच्या तरुणांना कॅमेऱ्याचे आकर्षण असल्यामुळे नाटक या पारंपरिक प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. तर, सामाजिक नाटकांना प्रेक्षक येत नाहीत हे वास्तव आहे. हे नाटक केवळ प्रायोगिक स्वरूपाचे न राहता गावोगावी त्याचे प्रयोग झाले पाहिजेत. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
जातीअंताच्या लढय़ाला अद्याप सुरूवात झालेली नाही – डॉ. बाबा आढाव
आजही आपल्या समाजात जातींना गोंजारले जात असून या देशामध्ये जातीअंताच्या लढय़ाला अद्याप सुरूवात झालेली नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केली.
First published on: 23-07-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba adhav mahatma phule drama