पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर असलेल्या भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. सध्या या भिडे वाड्याची दुरवस्था झाली आहे, या वास्तूचं जतन करून राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली आहे. ही मागणीकडे लक्ष वेधलं जात ती पूर्ण व्हावी यासाठी भिडे वाडयाबाहेर आढाव उपोषणाला बसले आहेत.
हेही वाचा… पुणे: राज्यात आजपासून थंडी वाढण्याची शक्यता
” देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. या घटनेला अनेक वर्ष होऊन गेले आहे. ज्या ठिकाणाहून देशात क्रांती घडविण्याचं काम झालं आज त्याच जागेची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी मागणी आम्ही आजवर अनेक वेळा केली. यावर प्रक्रिया सुरू असल्याचं उत्तर दिलं जात आहे. तसेच या जागेची शरद पवार यांनी पाहणी केली, पण त्यानंतर काही झाले नसून शरद पवार यांनी पुढे येऊन भूमिका मांडावी ” अशी मागणी आढाव यांनी यावेळी केली.
हेही वाचा… पुणे: नाताळ, नववर्ष स्वागतानिमित्त पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ९० टक्के आरक्षित
कालपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर चर्चा झाली. मात्र आपल्या सर्वांच्या या ऐतिहासिक ठिकाणाची चर्चा झाली नाही, याबद्दल वाईट वाटत असून आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे वाडयाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा बाबा आढाव यांनी यावेळी दिला.