पुणे : ‘एकीकडे भाषेला अभिजाततेचा दर्जा दिला जातो आणि दुसरीकडे व्यंगात्मक बोलले की दम मिळतो, अशी विरोधाभासाची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. सध्याच्या सरकारचे आणि विनोदाचे फार वाकडे आहे. कुणी विनोदाने बोलले, तरी गुन्हा दाखल केला जातो. जनतेच्या खऱ्या समस्यांपासून सरकार दूरच आहे,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी केली.
भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव बोलत होते. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, चिटणीस डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे अध्यक्ष अतुल रूणवाल, सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंंदडा या वेळी उपस्थित होते.
‘मुंबईच्या बंदरातून डोक्यावर पोती वाहून थप्पी रचणाऱ्या माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कायदा करण्यात आला होता. आता गरिबांसाठी असा एखादाच कायदा शिल्लक राहिला आहे. गरीब माथाडी कामगारांसाठीच्या कायद्यात बदल करण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घेतली. गरीब माथाडी कामगारांची घरे अशाने उद्ध्वस्त होतील,’ अशी खंत डॉ. आढाव यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत हातातली सत्ता निसटून जाऊ नये म्हणून वाटेल ते करण्याची, अगदी धर्मालाही राजकारणात आणण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. नैतिक मूल्यांची काही बूज राखायची गरज राहिली नाही, इतकी वाईट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. देशातील लोकशाही चार मोठी माणसे एकत्र येऊन टिकवू शकणार नाहीत. त्यासाठी जनतेने उठाव करण्याची गरज आहे. कवी-लेखक यांच्यातून ही सुरुवात झालेली दिसते. तत्काळ एकत्र येऊन स्पष्टपणे आणि वेळेवर आवाज उठवला पाहिजे. निरपराध माणसांचे बळी जाऊ नयेत, राष्ट्रीय एकात्मता जपावी म्हणून काम करणे गरजेचे आहे.’