लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी पुण्यातील एकाने समाज माध्यमात धमकीचा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे, तर सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेला एक जण काही काळापूर्वी पुण्यातच वास्तव्यात असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. सिद्दीकी यांच्या खुनाच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोचत असल्याचे यातून समोर येत आहे.
पंजाबमधील काँग्रेस नेता, प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, तसेच अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लाॅरेन्स बिष्णोई टोळीने पुण्यातील सराइतांशी संधान बांधल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील दोघांना अटकही करण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजे भागातील एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संदेशात लाॅरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकाविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
आणखी वाचा-हडपसरमध्ये खोक्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली
सिद्धीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सिद्दीकी प्रकरणात अटक करण्यात आलेला शिवानंदन उर्फ शिवा हासुद्धा काही महिन्यांपूर्वी पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. तो पुण्यात भंगार मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्या दृष्टीने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून पुण्यात तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमात मजकूर प्रसारित करण्यात आलेल्या तरुणाची या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
बिष्णोई टोळीशी असलेले ‘पुणे कनेक्शन’
मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरामधून अटक केली होती. त्याला आश्रय देणारा नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांना अटक करण्यात आली होती. तिघांचा बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचे तपासात उघडकीस आले होते. संतोष जाधव मूळचा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी, तर कांबळे मूळचा नारायणगावातील असून, त्याचा साथीदार सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. २०२१ मध्ये जाधव याने पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार करून खुन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. पसार झाल्यानंतर जाधव बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात आला.