यंदाच्या साहित्य संमेलनात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य संमेलनाने पुढे होणाऱ्या संमेलनांसाठी एक आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘कऱ्हाकाठ’ स्मरणिकेचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन र्मचट को-ऑप. बँकेचे अध्यक्ष का. दि. मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार, स्मरणिकेचे संपादक मनोहर सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, की सासवड ही शुरांची, वीरांची, कलाकारांची व देशभक्तांची भूमी आहे. अशा नगरीमध्ये साहित्य संमेलन होत असल्याने आनंद होतो आहे. या संमेलनाचे काम उत्तम चालले आहे. मुख्य म्हणजे या संमेलनातील वातावरण गोड व चांगले आहे. असेच वातावरण यापुढेही टिकावे.
अत्रेंविषयी बोलताना ते म्हणाले, की अत्रे व आपले जिव्हाळ्याचे नाते होते. आम्ही दोघेही सासवडकर, हा त्यातला एक धागा होता. सासवडची माणसे आपली आहेत, असे ते मानत होते. ते आजारी असताना एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी कऱ्हा व चांबळी नदीच्या तीरावरील संगमेश्वर मंदिर पाहत असताना आपला मृत्यू यावा, अशी इच्छा अत्रेंनी बोलून दाखविली होती.
स्मरणिकेबाबत ते म्हणाले, की संमेलनाच्या स्मरणिका पतपेढीच्या वार्षिक अहवालाप्रमाणे काढल्या जातात. या संमेलनाची स्मरणिका त्याला अपवाद आहे. स्मरणिका प्रेक्षणीय व वाचनीयही आहे. सासवडबाबत म्हणल, तर तिथे सर्वत्र इतिहास आहे. कऱ्हेपठाराबाबत काही नवीन माहिती उपलब्ध होत आहे. सासवडवर एखादा खंडच निर्माण करता येईल.
डॉ. वैद्य म्हणाल्या, की हे संमेलन साधेपणाने व देखणेपणाने आम्ही साजरे करणार आहोत. संमेलनाची ही स्मरणिका तरुणांनी खूप श्रम घेऊन तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी मोठय़ा उत्साहाने काम केले. स्मरणिकेच्या संपादक मंडळात सोनवणे यांच्यासह प्रा. रूपाली मुंजाळ, प्रा. राम जगदाळे, डॉ. शोभा पाटील, डॉ. अरुण कोळेकर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी दिवेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राम जगदाळे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा