एकविसाच्या दशकात प्रवेश केल्यानंतर आणि आधुनिक जीवनसरणी आत्मसात केल्यानंतरही स्त्रीभ्रूण हत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून एक मुलगी असलेल्या पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत, एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास आई व मुलगी यांच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी याबाबतची माहिती दिली. महिला बालकल्याण समितीमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत अशा पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी २५-२५ हजार रुपयांची मुदत ठेव देण्यात येणार आहे. याचबरोबर दोन मुली झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांनाही याचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारच्या १०३ लाभार्थीना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या एकूण ११ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
याशिवाय, पिंपळे निलख येथील महादेव मंदिर परिसर विकसित करण्यात येणार असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांकडून ऑनलाईन सुविधा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आवश्यक संगणक यंत्रणा खरेदी करण्यासाठी तीन कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध महापौर चषकांसाठी आवश्यक खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा