संजय जाधव
पुणे : प्रसूतिपूर्व गुंतागुंतीमुळे एका बाळाचा जन्म २६ व्या आठवड्यात झाला. त्याचे वजन केवळ ६८० ग्रॅम होते. मुदतपूर्व जन्म असल्याने त्या बाळाला श्वसनासह इतर समस्या जाणवत होत्या. या बाळावर तीन महिने रुग्णालयात गुंतागुंतीचे उपचार करण्यात आले. अखेर त्या बाळाला सुखरूपपणे घरी सोडण्यात आले आहे.
एका ३० वर्षीय महिलेची मुदतपूर्व प्रसूती खराडीतील मणिपाल रुग्णालयात झाली. या महिलेची २६ व्या आठवड्यात प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन केवळ ६८० ग्रॅम होते. मुदतपूर्व जन्म असल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. बाळाला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी सरफॅक्टन्टचे दोन डोस देण्यात आले. त्यातून त्याचे श्वसनमार्ग खुले राहण्यास मदत झाली. त्यानंतर त्याला श्वसनास मदत होईल, असे उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. सलग ३० दिवस बाळावर हे उपचार सुरू होते.
आणखी वाचा-पुणे: सराफावर गोळीबार करुन सोने लुटले; घोरपडीतील घटना
बाळाच्या हृदयातही काही दोष होते. हे दोषही उपचारांनी कमी करण्यात आले. बाळाचे कमी असलेले वजन हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. जन्मानंतर दुसऱ्या आठवड्यात बाळाच्या पचनसंस्थेत संसर्ग झाला. त्यावर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. अखेर तीन महिन्यांच्या गुंतागुंतीच्या उपचारानंतर बाळ सुखरुपपणे रुग्णालयातून घरी गेले. विशेष म्हणजे, एवढी गुंतागुंत असूनही बाळाच्या मेंदू आणि डोळ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती बाळावर उपचार करणाऱ्या डॉ. गितांजली इंगळे यांनी दिली.
बाळाला ७३ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नंतरही त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. बाळाची स्थिती सुधारल्यानंतर गुंतागुंतही कमी झाली. उपचारानंतर बाळाचे वजन १ हजार ५०० ग्रॅमवर पोहोचले. -डॉ. गितांजली इंगळे, बालरोगतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल (खराडी)