पिंपरी-चिंचवड : माजी कृषिमंत्री दादा भुसे यांचा कित्ता आमदार बच्चू कडू यांनी गिरवला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असा प्रश्न करत त्यांनी नागरिकांपुढे पर्याय ठेवला आहे. कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे आणि लसूण खायचा नसेल तर मुळा खा, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल आहे. मी सरकारमध्ये असलो तरी हे सरकार नालायक प्रवृत्तीचे आहे. हे सरकार कधी – कधी नामर्दासारखं वागतं. त्यांनी सुधारलं पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. ते माझं कर्तव्य आहे, असं देखील खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले आहेत. आमदार बच्चू कडू हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याचं समर्थन बच्चू कडू यांनी केल आहे. दादा भुसे यांनी कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, असं वक्तव्य केलं होतं. याच प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे. ते पण खायचं नसेल तर मुळा आहे. सरकार नामर्दासारखं वागतं कधी- कधी, ही नामर्दांगी आहे. सत्ता टिकावी म्हणून हे सरकार ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार करत आहे. पण, पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही. मी सरकारमध्ये असलो तरी ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधारली पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हे माझं कर्तव्य आहे. भाव वाढले म्हणून हस्तक्षेप करता. मग भाव कमी झाल्यास हस्तक्षेप का करत नाहीत? असा प्रश्न ही त्यांनी विचारला.
हेही वाचा – ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पुण्यातील एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल ३८ लांखाची केली चोरी
हेही वाचा – पुणेकरांचे २१०० कोटी ‘खड्ड्यात’, रस्ते दुरुस्तीची मलमपट्टी; खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कायम
“लोकांनी कांदा खाल्ला नाही तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असं एक तरी उदाहरण दाखवा”, असं बच्चू कडू म्हणाले. पुढे ते म्हणाले, मीडिया भाव वाढल्यास दाखवते मग कमी झाल्यास का दाखवत नाही. निर्यात शुल्क लावण्याची काही गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबरची व्यवस्था आज करून ठेवताय? कारण, अटलजी यांचं सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं. एवढं घाबरता का तुम्ही. आयात निर्यातमध्ये स्पष्ट धोरण घेतलं पाहिजे. परदेशात कांदा गेला तर सफरचंदाचा भाव येईल. या संदर्भात आम्ही सरकारच्या विरोधात उतरणार आहे, असे कडू म्हणाले.