करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखंच धोरण असेल असं अजित पवारांनी यांनी पुण्यात बोलतांना  स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावार भाष्य केले. करोनामुळे देशात सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील, असे अजीत पवार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सरकारने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे.

बकरी ईद सणासाठी राज्य सरकारनं गेल्यावर्षी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या त्या सुचना यावर्षी सुद्धा लागू असतील.

हेही वाचा- महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी; उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी

काय होत्या गेल्यावर्षीच्या मार्गदर्शक सूचना

१) करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

२) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.

३) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

४) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

५) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

६) करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.