महापालिका हद्दीतील बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी महापालिका करणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. बचत गटांकडून महापालिकेसाठी विविध सेवा घेण्याचाही प्रस्ताव आहे. बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा या प्रस्तावामुळे प्रत्यक्षात येईल.
महापालिकेचे अधीक्षक अभियंता आणि मध्यवर्ती भांडार प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी गुरुवारी ही माहिती दिली. महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने पुरस्कृत केलेले आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करणारे सुमारे आठशे बचत गट शहरात असून पालिकेतर्फे त्यांना विविध सेवा-सुविधा पुरवल्या जात असल्या, सवलती दिल्या जात असल्या, तरी त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ देण्याबाबत मात्र अद्याप प्रभावी यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. त्यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे कंदुल यांनी सांगितले.
महापालिकेची विविध खाती व विभाग कागद, फाईल्स, कार्यालयांसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी, झाडू, खराटे, फिनेल, स्वच्छतेसाठी लागणी सामग्री, खुर्चीवर ठेवण्याच्या उशा, टेबलक्लॉथ, कापडी पिशव्या, पडदे यासह शेकडो वस्तूंची खरेदी ठेकेदारामार्फत करतात. यातील अनेक वस्तू बचत गटातील महिलाही तयार करत असल्यामुळे ठेकेदारांमार्फत ही खरेदी न करता बाजारभावाचा विचार करून त्यांच्याकडून ही खरेदी करावी, असा हा प्रस्ताव आहे. अशा प्रकारे खरेदी करण्यासंबंधी मुख्य सभेने सन २००३ मध्ये ठराव मंजूर केला आहे. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. एका गटाकडून तीन लाख रुपयांपर्यंतची एका प्रकारची खरेदी एका वर्षांत करावी, असा प्रस्ताव असून स्थायी समितीने तो मंजूर केल्यास बचत गटांना मोठय़ा प्रमाणावर काम मिळू शकेल.
बचत गटांमध्ये अनेक सुशिक्षित महिला व युवती असून महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपातील कामांसाठी त्यांची नियुक्ती करून आवश्यक कामे बचत गटांकडून करून घेण्याचाही प्रस्ताव आहे. संगणकावर काम करण्याचा अनुभव असलेल्या बचत गटांची निवड त्यासाठी केली जाणार असून ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी नेमून जी कामे करून घेतली जातात, ती बचत गटांकडून करून घेण्याचा प्रस्ताव आहे. बचत गटांना उत्पादन व विक्रीचे प्रशिक्षण आणि हक्काची बाजारपेठ याबाबत केल्या जाणाऱ्या घोषणा या निर्णयानंतर प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

Story img Loader