पुणे : पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक संपुष्टात आला असला, तरी त्यामागील नेमके कारण अद्याप अनुत्तरित आहे. जीबीएस उद्रेकानंतर दोन महिन्यांनीही आरोग्य यंत्रणांना त्याचे कारण शोधण्यात यश आलेले नाही. जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पुण्यात ९ जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला. त्यानंतर जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात हा उद्रेक झाला होता. या उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पुण्यातील जीबीएसचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याचे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. हा उद्रेक संपूनही यामागील नेमके कारण आरोग्य विभागाने अद्याप जाहीर केलेले नाही.

आरोग्य विभागाने पुण्यात जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाणी आणि कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविले होते. त्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस १३९ पाणी नमुन्यांमध्ये आढळून आले. याच वेळी २८ कोंबड्यांच्या नमुन्यांमध्येही ते आढळले. त्यामुळे हा उद्रेक दूषित पाणी, की कोंबड्यांमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘एनआयव्ही’कडून पाणी आणि कोंबड्यांच्या विष्ठेच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जात आहे. त्यानंतर जीबीएस उद्रेकाचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

पुण्यातील जीबीएस उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र राज्याच्या आरोग्य विभागाला आम्ही पाठविले आहे. उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. राज्याच्या शीघ्र प्रतिसाद पथकाकडून जीबीएस उद्रेकाचे नेमके कारण जाहीर केले जाईल.डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका

पुण्यातील जीबीएस उद्रेकग्रस्त भागातील पाणी आणि कोंबड्यांच्या विष्ठेच्या नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस आढळून आले होते. त्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था करीत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या उद्रेकामागील नेमके कारण स्पष्ट होईल.डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग

Story img Loader