पुणे : सध्या प्रदूषणाची पातळी वाढली असून, खराब हवेमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. आता प्रदूषित हवेमुळे शरीरात दाह निर्माण होऊन त्यामुळे हृदयविकाराच्या धोक्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला हृदयविकाराच्या रुग्णांना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीतील इंटरमाउंटन हेल्थमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वतीने शिकागोमध्ये आयोजित वैज्ञानिक परिषदेत हे संशोधन सादर करण्यात आले. प्रदूषण वाढल्यानंतर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये इन्फ्लेमेटरी मार्कर (दाह निदर्शक) सीसीएल २७ आणि आयएल १८ यामध्ये वाढ होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. याच वेळी हृदयविकाराचा त्रास नसलेल्या रुग्णांमध्ये ही वाढ होत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे संशोधन भारतासाठी महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा-दिवाळीत पुण्यातील हवा विषारी! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

देशात सध्या प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे. अनेक शहरांत पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांची पातळी मर्यादेपेक्षा जास्त नोंदविण्यात येत आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक धोका वाढत आहे. पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी हृदयविकाराचे रुग्ण तयार नसतात. त्यामुळे शरीरातील बदल त्यांच्यासाठी धोकादायक बनतात. या संशोधनात हृदयविकाराचे ४४ रुग्ण आणि हृदयविकार नसलेल्या ३५ जणांचा अभ्यास करण्यात आला. त्यात जास्त प्रदूषण असलेल्या दिवशी हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दाह निदर्शकांची पातळी वाढल्याचे निष्पन्न झाले. याच वेळी हृदयविकार नसलेल्या व्यक्तींमध्ये हा बदल दिसून आला नाही.

पुण्यातील हवा खराब पातळीवर

पुण्यातील हवेची पातळी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता खराब नोंदविण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कात्रज डेअरी येथील केंद्राने हवा गुणवत्ता निर्देशांक २३८ नोंदविला. त्या खालोखाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रात निर्देशांक २०९ नोंदविण्यात आला. दोन्ही ठिकाणी हवेची पातळी खराब होती. याच वेळी कर्वे रस्ता, शिवाजीनगरमधील रेव्हेन्यू कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि आळंदी परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक सुमारे १२५ नोंदविण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी हवेची पातळी समाधानकारक होती.

आणखी वाचा-कसब्या पाठोपाठ खडकवासल्यात सर्वाधिक मतदान, दुपार पर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद

प्रदूषणामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना जास्त धोका निर्माण होतो. कोलेस्टेरॉलची उच्च पातळी असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्या तुलनेत प्रदूषणाच्या संपर्कात जास्त काळ असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आणखी वाढते. हवेतील प्रदूषक फुफ्फुसातून थेट हृदयात जाऊन गंभीर परिणाम करतात. त्यामुळे प्रदूषण वाढल्यानंतर हृदयविकाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. -डॉ. संदीप साळवी, संचालक, पल्मोकेअर रीसर्च अँड एज्युकेशन (प्युअर) फाउंडेशन

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad air increases risk of heart attack pune print news stj 05 mrj