नागरिक व पालिका प्रशासनातील अंतर कमी होऊन त्यांच्यात थेट संबंध येऊ लागल्याने आपली किंमत कमी झाल्याची भावना पिंपरी पालिकेतील नगरसेवकांमध्ये आहे. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा  आदेश आल्यानंतर अधिकारी कारवाईसाठी तप्तर असतात. मात्र, नगरसेवकांनी काही सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा संताप नगरसेवक व्यक्त करत आहेत.
चिंचवड-पिंपरी (ब) प्रभागाच्या बैठकीत नगरसेवकांनी याच भावना व्यक्त केल्या होत्या आणि दुटप्पीपणाचा आरोप करून अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभा तहकूबही केली होती. स्थायी समिती तसेच पालिका सभांमधून सदस्यांनी वेळोवेळी याच तक्रारी मांडल्या आहेत. नागरिकांनी आयुक्तांना ‘एसएमएस’ केला किंवा फोन केला की त्या तक्रारीची अधिकाऱ्यांकडून तातडीने दखल घेतली जाते. आयुक्तांच्या पुढाकाराने ‘सारथी’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली, तेव्हापासून नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. एका महिन्यात तब्बल पाच हजार नागरिकांनी ‘सारथी’चा लाभ घेतला आहे. मात्र, त्याच तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या तर अधिकारी त्यावर कार्यवाही करत नाहीत. महिनोन्महिने तिकडे पाहिले जात नाही. रस्त्यांवरील खड्डे, पाण्याची ओरड, टपऱ्या व हातगाडय़ांचे अतिक्रमण अशा अनेक विषयांवर दुजाभाव अनुभवास येतो, त्यामुळे आम्हाला काही किंमत आहे की नाही, असाच सूर सदस्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो आहे.

Story img Loader